मतचोरीच्या विरोधात १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या रॅलीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परखड शब्दांत सुनावले.
'ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करा असे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा. अवघ्या ३० सेकंदात आम्ही आंदोलन थांबवतो,' असे राहुल गांधी म्हणाले. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या आणि एसआयआर थांबवण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीची महारॅली होणार आहे.
ही रॅली १० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलावी, अशी मागणी 'चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री' (CTI) या व्यापारी संघटनेने राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 'दिवाळी हा व्यापाराचा सीझन असतो. या दिवसांत रॅली झाल्यास रामलीला मैदानाच्या आसपासच्या घाऊक आणि किरकोळ बाजाराला त्याचा मोठा फटका बसेल. यामुळे व्यापाऱ्यांचे सुमारे १० हजार कोटींचे नुकसान होऊ शकते,' असे संघटनेचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी पत्रात म्हटले आहे.
आरोपी क्रमांक ४
व्यापाऱ्यांच्या या पत्राला राहुल गांधी यांनी आज 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून उत्तर दिले. ते म्हणाले, 'दिल्लीच्या प्रत्येक व्यापाऱ्याविषयी आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे. तुमचे म्हणणे आम्ही ऐकत आहोत, पण सरकार आमचे ऐकत नाही.
सरकारने मेट्रो बंद केली, रस्ते अडवले आणि देशाच्या राजधानीला टाळे ठोकले. आता तुम्ही मोदींना सांगा की, आरोपी क्रमांक ४ ज्ञानेश कुमार यांना पदावरून हाकला; अवघ्या ३० सेकंदात आंदोलन थांबेल.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.