कोल्हापूर: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही 'समान काम, समान वेतन' मिळावे, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. राज्यातील ३४ हजार ५०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निवृत्त कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच इथून पुढे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज जिल्हा व सत्र न्यायालयासमोर केलेल्या निदर्शनामध्ये महेश पाटील, शीला काशीद, बाबासाहेब तांबे, अन्वर पठाण यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ५ नोव्हेंबरला एक दिवस सामुदायिक रजा तसेच ५ व ६ नोव्हेंबर असे दोन दिवस अन्नत्याग करून आंदोलन करणार असल्याचेही सांगण्यात आले.
शाहूवाडीतही निदर्शने
शाहूवाडी आज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम करून निदर्शने केली. आंदोलनात येथील सहायक अधीक्षक रवींद्र गायकवाड, वरिष्ठ लिपिक शिवाजी पाटील, यशोदा पाटील, बेलिप बाजीराव पाटील, अमर गिरी, गणेश पाटील, सुचिता पेटकर, पूनम कांबळे आदींसह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.