कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सुधारित कायद्यानुसार सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना संचालक मंडळात राहता येत नाही. रिझर्व्ह बँक अशा संचालकांना कमी करण्याबाबत बँक प्रशासनाला आदेश देऊ शकते. पण, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रोखू शकत नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा बँकेच्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या २७ संचालकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने बँकिंग रेग्यूलेशन ॲक्ट १९४९ मध्ये सुधारणा करत सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम करण्यावर निर्बंध आणले आहेत. मात्र, राज्य शासनाने मध्यंतरी एक परिपत्रक काढत तशा प्रकारची कारवाई करू नये, असे सहकार विभागाला सांगितले.
लातूर जिल्हा बँकेच्या आठ संचालकांविरोधात बँकेचे माजी कर्मचारी सतीश जाधव यांनी लातूर विभागीय सहनिबंधक व त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अपात्र ठरवल्यावर राज्यभरातील सहकारातील नेत्यांची झोप उडाली. बहुतांश बँकांत मातब्बर संचालक २५-३० वर्षे तळ ठोकून आहेत. सांगली, सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केलेल्या मातब्बरांचा कार्यकाळ दहा वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यास हरकतीही घेण्यात आल्या पण, उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरवणे किंवा अर्ज नामंजूरीचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही. निवडून आल्यानंतर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार हे निश्चित आहे.
परिपत्रक की कायदा? निवाडा कोर्टातच! राज्य सरकारने मध्यंतरी परिपत्रक काढून जिल्हा बँकांची नोंदणी राज्य सरकारच्या नियमांनुसार होत असल्याने त्यांना केंद्राचा कायदा लागू होत नाही, असा दावा केला. सहकार विभागाला अशा प्रकारची कारवाई न करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारचे केवळ 'परिपत्रक' आहे आणि केंद्राने थेट 'कायद्यातच' दुरुस्ती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ की राज्य सरकारचे परिपत्रक असा कायदेशीर पेच तयार झाला आहे. त्याचा अंतिम निवाडा न्यायालयातच होण्याची शक्यता आहे.
या मातब्बरांचा समावेश...कोल्हापूर (०९) : हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलीक, निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भैय्या माने, राजू आवळे, संतोष पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर.सातारा (१०) : उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर, नितीन पाटील, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते, दत्तात्रय धमाळ, प्रभाकर घार्गे.सांगली (०८) : मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, दिलीप पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, मोहनराव कदम, सुरेश पाटील व बाळासाहेब होनमोरे.
रिझर्व्ह बँक अशा प्रकारच्या संचालकांना अपात्र करण्याबाबतचे आदेश देऊ शकते. पण, निवडणुकीसाठी रोखू शकत नाही. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालानुसार संबंधित इच्छुक उमेदवारांचा अर्ज बाद करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नसतो. - ॲड. लुईस शहा, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.