Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली

 विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली


बीड : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थाच हरवली आहे. खून, मारामारी, हल्ले, विनयभंग, बलात्कार, लुटमार, वाहतूक समस्या अशा गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे, यावर राष्ट्रवादीचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी आमदार सोळंके यांनी, बीडचा बिहार झाल्याची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नाही. गुन्हेगारांना सर्रासपणे अभय देण्याचं काम जिल्ह्यात सुरू आहे, असे म्हटले. यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एसपी आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर 'लोकमत'मधून शनिवारी' कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, जनतेत भीती; बीड जिल्ह्याचा होतोय का बिहार ? असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबतच आमदार प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी आमदार सोळंके म्हणाले, बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. जिल्हाधिकारी कार्यालयात जो काही गोळीबार झाला त्यात ज्यांच्यावर गोळीबारी झाला त्यांच्यावर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय. बीडमध्ये गुन्हेगारी वाढतेय त्याला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पोलीस खात्यात ज्या बदल्या झाल्या त्यात मोठा भ्रष्टाचार झाला. दरमहिन्याला हे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनमधून हफ्ता गोळा करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पोलीस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच या लक्षवेधीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी देखील, बीड जिल्ह्यात गृहखातं पूर्णपणे कोसळलं आहे. या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

या घटनांनी हादरला जिल्हा

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक कार्यालयातील भरदुपारी झालेला गोळीबार, परळीतील बहीण-भावाचा खून, परळीतच पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून, अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील तीन चिमुकल्यांसह आईचा संशयास्पद मृत्यू, गेवराई व परळीत मृतदेहांचे सांगाडे आढळणे, आडसमध्ये काकाचा पुतण्यानेच केलेला खून, सिरसदेवीमध्ये झोपेतच दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये बहिणीसह नियोजित वरावर भावाचा हल्ला, परळीत जुन्या रेल्वे स्थानकाजवळ युवकावर हल्ला, आष्टी तालुक्यातील वटाणवाडी येथे महिलेचा खून या गंभीर घटनांनी जिल्हा हादरला. एवढेच नव्हे तर परळीतील संभाजीनगर ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून झालेला अत्याचार, परळी ग्रामीण ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या सारख्या गंभीर व अंगावर थरकाप आणणाऱ्या घटनांचा हा लेखाजोखा आहे. यासह चोरी, अवैध वाळूउपसा, अवैध धंदे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, मारामाऱ्या, शासकीय कामात अडथळा आदी गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.