आत्ता गद्दारांना कंठ फुटू लागले आहेत
शिवसेना फितुरांना पुरून उरणार !
काल परवा पर्यंत मातोश्रीकडे तिकिटं व पदं मिळवण्यासाठी लाळ घोटत फिरणारे सूरत,गुवाहत्ती व गोवाचे पाणी चाखून आल्यानंतर आमुलाग्र बदलले आहेत. शेपुट घालून मातोश्रीच्या कृपादृष्टीसाठी मातोश्री सभोवती घुटमळणारे आत्ता डॉबरमनच्या आवेशात गुरकावत आहेत. साहेब, आदेश द्या, तुमच्या हुकमाचा तालेवार आहे,म्हणणारे आत्ता कोण उद्धव ठाकरे, आमचीच खरी शिवसेना, आम्हीच बाळासाहेबांचे वारसदार! अशी कोल्हेकुई करू लागले आहेत.
दिल्लीतील महाशक्तीच्या जोरावर यांचे आवाज व सूर बदलले आहेत. दसरा मेळाव्यातही खो घालण्याचा संतापजनक प्रकार सुरू झाला आहे.आम्हीच खरे हिंदूत्ववादी व धर्मरक्षक आहोत, या अविर्भावात दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.सत्तेच्या ग्रँड मस्ती मुळे माजलेले हे खोकेवीर बोके शिवसेनेस जेरीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंदिरा गांधींच्या आणिबाणी पेक्षा भयंकर हिटलरशाही सुरू आहे. सहनशक्तिचा कडेलोट करणारी कृत्यं राजरोसपणे केली जात आहेत.दही हंडीत राजकारण करून मन तृप्त झाले नाही म्हणून आत्ता मुख्यमंत्री दारोदार हिंडून गणेश दर्शना च्या निमित्ताने फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करीत आहेत. दबाव व धाकदपटशा या गैरमार्गांचा अवलंब करून शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी फोडण्याचे काम या उत्सवांच्या निमित्ताने केले जात आहे. शिवसेनेचे थनुष्यबीण हे अधिकृत निवडणूक चिन्ह त्यांना मिळू शकत नाही याची खात्री होताच चिन्ह गोठवण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. शिवसेना हा ज्यांच्यासाठी वर्षानुवर्षे कल्पवृक्ष होता,त्याच्याच मुळावर घाव घालण्यासाठी साम,दाम,दंड व भेद नीती चा अमानवी पद्धतीने अवलंब केला जात आहे.
"अति तिथे माती" हा निसर्गाचा नियम आहे. माटी कहे कुंभारसे, तू क्या रोंदे मोहे,एक दिन ऐसा आयेगा मै रोंदुगी तोहे, याची आठवण या गद्दारांनी ठेवली पाहिजे.रावणी प्रवृत्तीचा अंत होतो,त्याची लंका सोन्याची असली तरी तिची जळून राखरांगोळी होते, हा विधीलिखित नियम आहे.एकनाथ शिंदे व त्यांच़्या 40+12 साथीदारांच्या टोळीने नैतिक अध:पतन व नीतिमत्तेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
मोदी,शहा व फडणवीस यांनी भरलेल्या इंधनाच्या जोरावर आकाशात कितीही उंच घिरट्या घालू द्या,एकदा का हे उसने इंधन संपले की यांचे उंच आकाशात घिरट्या घालणारे विमान/हेलिकॉप्टर तितक्याच वेगाने जमीनीवर आपटेल. पण सद्या त्या इंधनाची नशा सर्वांगात भिनलेली असल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याप्रमाणे ते बरळत आहेत. शिवसेना संपवून मुंबई ताब्यात आली कि ती केंद्रशासित करणे हा भाजपाचा मनसुबा आहे,त्यासाठी भाजपाने यांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे.एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक भाजपाच्या चक्रव्युहात तर गेले पण त्यांचा परतीचा मार्ग महाशक्तिने बंद केला आहे. शिवसेनेत डरकाळी फोडत स्वच्छंदपणे वावरणारे वाघ आत्ता गळ्यात पट्टा अडकवलेले व दात काढून घेतलेले पिंज-यातील वाघ झाले आहेत. जय महाराष्ट्र चा बुलंद नारा देणारे दिल्लीश्वराचे हुजरेकरी झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातही वतनासाठी गद्दारी करणारे गणोजी शिर्के होते तसेच वैयक्तिक स्वार्थ, कैद,केसेस, मालमत्ता जप्ती टाळण्यासाठी हे लोक भाजपाचे दास झाले आहेत. भाजपाने दाणे टाकून झुंजवण्याचा डाव आखला, मराठी-मराठीत झुंज लावून गुजरात प्रेमी महाशक्ति बिनपैश्याचा तमाशा पाहून मनातल्या मनात मांडे रचत आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्राने असे अनेक गद्दार व फितुर पचवले व आपले हिंदवी साम्राज्य राखले तसेच शिवसेना या फितुरांना जमीनदोस्त केल्याखेरीज राहणार नाही.
दिलीप मालवणकर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
