बुडत्या काँग्रेसला यात्रेचा आधार
एकीकडे भाजप अत्यंत विचारपूर्वक पाऊले टाकत असताना गेल्या आठ वर्षांत कॉंग्रेसकडे भाजपला रोखण्यासाठी कोणतीही योजना नव्हती, कसलीही दूरदृष्टी नव्हती. पक्षाला नेतृत्वाची वानवा भासत होती. त्यातच अनेक काँग्रेस नेत्यांनी आपणहून भाजपची वाट धरली. उरलेल्या अनेकांना भाजपने ईडीसारख्या संस्थांचा वापर करून भाजपवासी होण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत ही भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी करो या मरो ची खेळी आहे. यात काँग्रेसला यश मिळाले तर भविष्यात काँग्रेस पक्ष म्हणून टिकेल नाहीतर सगळेच काही संपण्याच्या बेतात आहे. यामुळेच काँग्रेस आक्रमकपणे या यात्रेत उतरली आहे. दरम्यान भाजपचे नेते मात्र या यात्रेला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. कन्याकुमारीत असूनही राहुल गांधींनी स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट दिली नाही, राहुल गांधींचा टीशर्ट ४५ हजारांचा आहे अशांसारखे अनेक मुद्दे उपस्थित करत भाजपची 'ट्रोल गँग' आपले नेमून दिलेले काम चोख पार पाडत आहे.
या सगळ्यात भारत जोडो यात्रेचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय प्रभाव पडेल हाही मुद्दा चर्चिला जातोय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपशी काडीमोड झाल्यापासून विरोधकांच्या ऐक्याच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. नितीशकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यातील विरोधकांच्या भेटीगाठींमुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकारिणीच्या बैठकीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विरोधी एकजुटीसाठी शरद पवार मध्यस्थींच्या भूमिकेत असतील असे विधान केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार, अखिलेश यादव, चंद्रशेखर राव, स्टॅलिन असे आम्ही विरोधक एकत्र येऊ आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवू असे म्हटले. बिहारचे उपमुख्यमंत्री, राजदचे तेजस्वी यादव यांनी विरोधकांचे ऐक्य आणि कॉंग्रेसची भूमिका यासंदर्भात वक्तव्य करताना म्हटले की ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष मजबूत असेल तेथे काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या हाती सुकाणू द्यावे. आजच्या घडीला विरोधी पक्षांपैकी सर्वात जास्त खासदार काँग्रेसकडे आहेत. ज्या राज्यात भाजपचा काँग्रेसशी थेट सामना आहे अशा राज्यांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित करावे. राजस्थान, मध्य प्रदेश. हरयाणा, हिमाचल प्रदेश या उत्तर भारतीय राज्यांत भाजपचा कॉंग्रेसशी एकास एक असाच सामना आहे. कर्नाटकातही तीच परिस्थिती आहे. पंजाब व गुजरातमध्ये 'आप' ने मुसंडी मारली असली तरी तेथेही त्याआधी भाजप आणि काँग्रेसच आमने सामने होते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी ठामपणे म्हटले की काँग्रेसला दुय्यम स्थान देऊन वा वगळून भाजपविरोधी विरोधकांच्या एकजुटीला अर्थच उरणार नाही. भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसच्या हत्ती जागा झाला आहे. काँग्रेस भाजपविरोधी ऐक्याचा प्रमुख स्तंभ आहे. भारत जोडो यात्रा देशातील लोकांना जोडण्यासाठी आणि काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काढण्यात आली आहे.
या यात्रेत उपस्थित केले जाणारे दहशतीचे राजकारण, धार्मिक विद्वेष, रोजगार उद्ध्वस्त करणारी अर्थव्यवस्था, गरीब श्रीमंतात वाढणारी दरी हे सारे मुद्दे काही नवीन नाहीत. काँग्रेसच्या आणि इतर भाजपविरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदांमधून, धर्मनिरपेक्षतावादी गोटांच्या सोशल मीडियातून या मुद्द्यांचा सतत पुनरुच्चार होत असतो. या यात्रेमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मुद्दे पोहोचतील असा सूरही लावला जाईल परंतु १५० दिवस हा हा म्हणता निघून जातील आणि कॉर्पोरेट-धर्माध युतीची 'कॉर्पोरेट इंडिया'वरील पकड तशीच राहण्याचा धोका आहेच.
राहुल गांधी म्हणत आहेत की ही पदयात्रा त्यांच्यासाठी एक तपस्या आहे आणि ते दीर्घ पल्ल्याच्या लढतीसाठी तयार आहेत. पण त्यासाठी आधी काँग्रेसला भारत जोडो यात्रेच्या वेळी जनतेसमोर आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. आतापर्यंत महागाई आणि बेकारी रोखण्यात भाजप सरकारला अपयश आलेले आहे. देश धार्मिक विद्वेषाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यावर देशाचे भविष्य काय असेल याचे स्पष्ट चित्र काँग्रेसला जनतेसमोर उभे करावे लागेल. असे झाले तरच देशाच्या समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष तत्त्वांचे घटनादत्त स्वरूप टिकून राहावे असे ज्यांना मनापासून वाटते ते सर्व या यात्रेचे मनापासून स्वागत करतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.