भाजी खरेदी करणाऱ्या महिलांचे चित्रीकरण करणाऱ्या विक्रेत्यास नागरिकांनी धोधो धुतले
सांगली: शहरातील शंभरफुटी रस्त्यावर भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांचे मोबाइलमध्ये चोरून चित्रण करणाऱ्या विक्रेत्यास नागरिकांनी बदडले संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. संतोष सुभाष कांबळे (वय ३३, रा. गांधीनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित कांबळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील रहिवासी आहे. संतोष हा भाजी विक्रीसाठी आला होता. यावेळी या परिसरातील काही महिला भाजी घेण्यासाठी आल्या होत्या. संशयित कांबळे हा त्या महिलांचे चोरून मोबाइलमध्ये चित्रण करत होता.यातील काही महिलांना संशय आल्याने त्यांनी इतरांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.