उदघाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले , मुख्यमंत्रीची अशी झाली फजिती!
मुख्यमंत्रीपद म्हणजे लय धावपळीचा विषय... याचं उद्घाटन, याची सभा, यांचा समारंभ अशी लय किटकिट मागे लागलेलीच असते. शिवाय कार्यकर्त्यांना नाराज करून जमतंय तरी कुठं? त्यामुळे काहीही झालं तरी जावं लागलंय. अशातच आता मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांना नाय... बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नितीश कुमार एका कार्यक्रमात उद्घाटन करत असताना पार घसरून पडल्याचं पहायला मिळतंय. नेमकं काय झालं पाहुया...
त्याचं झालं असं की, आज शिक्षक दिन साजरा केला जातोय. त्यामुळे देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले. मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यावेळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर देखील त्याठिकाणी उपस्थित होते.
दोन्ही प्रमुखांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम पार पडला. त्यानंतर व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री गेले. त्यावेळी उद्घाटनासाठी फलकावरील पडद्याजवळ येताच त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या त्यांच्या बॉडीगार्डने त्यांना उचललं. मुख्यमंत्री पडल्याचं पाहताच गोंधळ सुरू झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हसत हसत आपण ठिक असल्याचं सांगितलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. राज्यपाल इथे बसले आहेत. मी स्वतः त्यांना विद्यापीठ दाखवीन, असं म्हणत नितीश कुमार यांनी प्रेक्षकांच्या टाळ्या कमावल्या. त्यावेळी त्यांनी राजभवन आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणताही संघर्ष नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी नितीश कुमार यांनी पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त करून दाखवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)