Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्र्यांनी मागितला सरकारकडे दाढीचा खर्च ; लाखो रूपयांची प्रतीपूर्ती

मंत्र्यांनी मागितला सरकारकडे दाढीचा खर्च ; लाखो रूपयांची प्रतीपूर्ती 


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी रुग्णालयातील उपचारानंतर सरकारकडे हातमोजे, रुमाल, मास्क, कापूस, टूथब्रश, सॅन्डविच आणि दाढीचा खर्च मागितल्याचे उघडकीस आले आहे.
विशेष म्हणजे, यापैकी तीन जण आता महायुती सरकारमध्येही मंत्री आहेत. त्यातील दोन राष्ट्रवादीचे, तर एक शिवसेनेचे (शिंदे गट) आहेत. 

या मंत्र्यांनी असा चिल्लर खर्चही सरकारी तिजोरीतून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, मुंबईत घेतलेल्या उपचाराचा खर्च सरकारकडून घेताना तो जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून प्रमाणित करून घ्यावा लागतो. टूथपेस्ट, दाढी आदीचा खर्च काही लाखांच्या घरात दाखविण्यात आला होता. तथापि, नियमांवर बोट ठेवत वैद्यकीय अधीक्षकांनी या खर्चाची प्रतिपूर्ती करता येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, अन्य खर्चाची लाखो रुपयांची प्रतिपूर्ती मंत्र्यांना करण्यात आली.

मंत्र्यांना वेतन किती?

कॅबिनेट मंत्र्यांना २ लाख ८५ हजार रुपये, तर राज्यमंत्र्यांना २ लाख ६३ हजारांच्या आसपास दरमहा वेतन मिळते. वेतनाशिवाय मंत्र्यांना वैद्यकीय खर्च आणि प्रवास खर्चही दिला जातो. सध्या जवळपास ८१३ माजी आमदारांना दरमहा प्रत्येकी ५० हजारांची पेन्शन, तर विद्यमान आमदारांना दरमहा २ लाख ४० हजार ९७३ रुपये वेतन मिळते.

...तरीही मागितला खर्च

आजी - माजी मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून केला जातो. कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची प्रतिपूर्ती केली जाईल, याबाबत विधानमंडळ सचिवालयाचे नियम आहेत. त्यानुसारच प्रतिपूर्ती मागणे अपेक्षित असताना अगदी किरकोळ खर्च काढून घेण्याचा प्रयत्न आजी - माजी मंत्र्यांनी केला, हे 'लोकमत'ला प्राप्त कागदपत्रांवरून स्पष्ट होते. 

काेणी काेणी घेतला सरकारी खर्चाचा लाभ ?

एक तत्कालिन वजनदार मंत्री सप्टेंबर २०२० मध्ये जसलोक रुग्णालयात भरती होते. त्यांनी आयव्ही सेट, हातमोजे, मास्कचाही खर्च मागितला. दुसरे खासगी रुग्णालयात १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दाखल झाले होते. त्यांनी ड्रेसिंग किट, तेल, सुया, ब्लेड, टॉवेल आदींचाही खर्च मागितला होता. अन्य एक खासगी रुग्णालयाला एप्रिल २०२० मध्ये भरती असताना त्यांनी युरीन बॅग, कापूस बंडल, नोंदणी फी, जेल, आयव्ही किट, मास्क, हातमोजे आदींपोटी १ लाख ५० हजार रुपयांच्या प्रतिपूर्तीची लेखी मागणी केली होती. आणखी एकाने मास्क, साबण आदींचा १४ हजार रुपयांचा खर्चही मागितला होता. 

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या एका मंत्र्याने टिश्यूपेपर, टॉवेल, सौंदर्य प्रसाधने, कापूस, थर्मामीटर, हँडवॉश, फेस वॉशसाठीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मिळावेत, अशी मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये एक मंत्री असेही होते, की जे दोनच दिवस खासगी रुग्णालयात भरती होते. पण, हातमोजे, सौंदर्य प्रसाधने, डेटॉल, टिश्यू पेपर आदींसाठी २,३३७ रुपयांची लेखी मागणी त्यांनी केली होती.nठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री आणि सध्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या एकाने तर मार्कर पेन, जेल, ब्लँकेट, पेन ड्राइव्ह, टॉवेलचाही खर्च मागितला होता. तेव्हा राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री असलेल्या अन्य एकानेही अशाच किरकोळ खर्चाची बिले लावून प्रतिपूर्ती मागितली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.