Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्या तुरुंगात वाल्मिक कराड, तिथला धक्कादायक प्रकार समोर; दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन!

ज्या तुरुंगात वाल्मिक कराड, तिथला धक्कादायक प्रकार समोर; दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन!
 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. हे प्रकरण नंतर चांगलेच गाजले. या हत्येनंतर बीडमधील गुंडाराजचे एकापेक्षा एक धक्कादायक अशी प्रकरणं समोर आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असून सध्या तो बीडच्या तुरुंगात आहे. दरम्यान, तो ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरूंग अधिकाऱ्याला आणि एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे.

तुरुंग अधिकाऱ्यांवर केली मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाचे वरिष्ट अधिकारी डी. डी. कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना त्यांच्यावर मोठा ठपका ठेवण्यात आला आहे. रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांना भेटू दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तपासणीत धक्कादायक सत्य आलं समोर
तसेच कारागृहात अनेक त्रुट्या आढळून आल्यानेही ही कारवाई करण्यात आली आहे. कवाळे नामक अधिकाऱ्यांकडे दीड महिन्यांपूर्वी बीड कारागृहाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. यादरम्यान कारागृह महासंचालक कार्यालयातील एका पथकाने बीड कारागृहाची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्यामुळेच पुणे येथील अपर पोलीस महासंचालकांना ही मोठी कारवाई केली आहे.
तो कैदी नेमका कोण?

गेल्या काही दिवसांपासून याच कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती, असा वारंवार आरोप होत होता. एकीकडे हा आरोप होत असतानाच या तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आणि महिला शिपायाचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटू दिलेला ‘तो’ कैदी नेमका कोण? आहे, याबाबत विचारले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कारागृहातील अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले नाही. असे असताना बीडच्या तुरुंगाबाबत करण्यात आलेल्या कारवाईला चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

सुरेश धस यांनी केली मोठी मागणी
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगांत ठेवावं अशी मागणी केली जात आहे. बीडच्या तुरुंग प्रशासनाबाबत अनेक तक्रारी निश्चितच आहेत. याबाबतचे काही पुरावे हाती येत आहेत. त्यानंतर आम्ही पुराव्यासहित तक्रार करू, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. तसेच संतोष देशमुख यांच्या खून्यांना एका जागेवर ठेवू नये ही मागणी आम्ही करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता तुरुंग अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.