Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुग्णाला तपासण्यास नकार दिला; कोल्हापुरातील रामानंदनगरात डॉक्टरांच्या क्लिनिकवर दगडफेक, वाहने फोडली

रुग्णाला तपासण्यास नकार दिला; कोल्हापुरातील रामानंदनगरात डॉक्टरांच्या क्लिनिकवर दगडफेक, वाहने फोडली
 

कोल्हापूर : रात्री उशीरा रुग्णाला तपासण्यास नकार का दिला, दवाखाना का बंद केला, या कारणावरून रामानंदनगर येथील एका डॉक्टरांवर दहशत निर्माण करून क्लिनिकसह, बाबा जरगनगर येथील त्यांचे राहते घर, दवाखान्यासमोरील मित्राच्या घरासह, चार वाहनांवर चौघांनी गुरुवारी मध्यरात्री दगड, विटांचा मारा करून दहशत निर्माण केली.


क्लिनिकपासून ते घरापर्यंत डॉक्टरांचा पाठलाग करून तरुणांनी त्यांच्या पाठीत वीट मारून जखमी केले. तरुणांनी त्यांच्या घराच्या काचा फोडून परिसरातील चारचाकी वाहने फोडली. या घटनेने मध्यरात्री परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.  या प्रकरणी करवीर पोलिसांनी वृषभ साळोखे (पूर्ण पत्ता नाही) याच्यासह तीन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला. रात्री उशीरा त्यातील दोघांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. विनीत वसंतराव देशपांडे (वय ६१, रा. प्लॉट क्रमांक २७, अ, लेआऊट नं. २, बाबा जरगनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली. घटनेत डॉक्टरांसह त्यांचा मित्र संतोष आकोळकर जखमी झाले.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशपांडे यांचे रामानंदनगर मुख्य रस्त्यावर येथे उषा क्लिनिक आहे. ते क्लिनिकचे काम संपवून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जरगनगरात घरी जात असताना चौघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी दादाची तब्येत ठिक नाही, त्यांना तपासा, असे त्या तरुणांनी सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी दवाखाना बंद केल्याचे सांगताच त्या तरुणांना राग आला. डॉक्टर क्लिनिक बंद करून गेल्यानंतर चार मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली. घराच्या दारात पार्क केलेली त्यांची चारचाकीची फोडली.

यावेळी दगड, विटांचा आवाज आल्यानंतर डॉ. देशपांडे बाहेर आल्यानंतर तरुणांनी त्यांच्या पाठीत वीट फेकून मारली. त्यात ते जखमी झाले. ही दगडफेक सुमारे दहा मिनिटे सुरू होती. त्यांनी दगड आणि विटांचा मारा करून घराच्या काचा फोडल्या. यावेळी भयभीत झालेल्या डॉक्टरांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दूरध्वनीवरून पोलिसांना दिली. त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांनी परिसरात या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत.
पोलिस निघून गेल्यानंतर पुन्हा ते तरुण मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारात त्यांच्या जरगनगरातील क्लिनिकवर गेले. या क्लिनिकवरही दगडफेक करून काचा फोडून मोठे नुकसान केले. दगडफेकीचा आवाज ऐकून डॉ. देशपांडे यांचे क्लिनिक समोर राहणारे मित्र संतोष आकोळकर बाहेर आले. त्यांनी या प्रकाराचा जाब विचारल्यानंतर तरुणांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा, चारचाकी फोडली. या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. बाबा जरगनगर परिसरातील चार वाहने तरुण फोडून पसार झाले.

एकावर गुन्हा दाखल
डॉक्टरांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. रुग्णाला तपासा असे सांगणाऱ्या या तरुणांना धड चालताही येत नसल्याचे जबाबात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या तरुणांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.