घर झाडणे, फरशी पुसणे ही अगदी रोजची कामं. त्या कामांमध्ये सहसा खंड पडतच नाही. आता काही घरांमध्ये फरशी पुसण्यासाठी मॉप वापरतात, तर काही घरांमध्ये कपडा घेऊन फरशा पुसल्या जातात. मॉप असो किंवा कपडा असो..
रोजच्या रोज वापर झाल्याने काही दिवसांतच तो घाण होऊ लागतो. कपड्याला किंवा मॉपला अगदी कळकट रंग येतो. फरशी पुसल्यानंतर आपण तो रोजच्या रोज धुतो. पण तेवढी त्याची स्वच्छता पुरेशी होत नाही. म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी त्याची खाली सांगितलेल्या पद्धतीने स्वच्छता करून पाहा . यामुळे त्याच्यावर चढलेला कळकट, मातकट रंग निघून जाईल आणि मॉप किंवा कपडा अगदी स्वच्छ निघेल
मॉप किंवा फरशी पुसण्याचा कपडा कसा स्वच्छ करावा?
मॉपच्या किंवा कपड्याच्या स्वच्छतेसाठी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या.
त्या पाण्यामध्ये १ चमचा मीठ, १ चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे व्हिनेगर घाला.
पाणी थोडं हलवून घ्या आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे डेटॉल आणि तेवढ्याच प्रमाणात हार्पिक घाला.
सगळं पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या पाण्यामध्ये मॉप अर्ध्या तासासाठी भिजत घाला. जर तुम्ही कपडा धुत असाल तर त्यावेळी पाण्यात हार्पिक घालू नका. कारण कपडा हाताने धुवावा लागेल आणि त्वचेसाठी हार्पिक चांगले नाही.
मॉप अर्धा तास या पाण्यात भिजत घातल्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढा आणि त्याच्यासोबत असणाऱ्या कंटेनरमध्ये घालून गोलाकार फिरवून नेहमीप्रमाणे त्याच्यातलं पाणी काढून टाका.
यानंतर पुन्हा १- २ वेळा पाणी बदलून मॉप त्याच पद्धतीने धुवून घ्या. मॉप अगदी स्वच्छ झालेला जाणवेल. एरवी गडबडीत अशा पद्धतीने मॉप स्वच्छ करणे शक्य नसले तरी आठवड्यातून एकदा या पद्धतीने तो स्वच्छ केलाच पाहिजे. यामुळे मॉपला येणारा कुबट वासही कमी होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.