नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून देशात सामूहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच गुजरातमधील डायमंड सिटीमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना समोर येत आहे. प्रकरणात पोलिसांनी सुरत शहरातील भाजपा पदाधिकाऱ्याला आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. दोघांवरही 23 वर्षीय तरुणीवर हॉटेलमध्ये
नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सुरतमधील
जहांगीरपुरा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील वेड रोड परिसरात राहणारी 23 वर्षीय तरुणी रविवारी (18 मे) रात्री एका ओळखीच्या व्यक्तीसोबत कारने सुवाली समुद्रकिनाऱ्यावर गेली होती आणि त्याच गाडीने रात्री पुन्हा ती तिच्या घरी आली. मात्र घरी आली तेव्हा तरुणी चालण्याच्या स्थितीत नव्हती आणि ती रडत होती. तिच्या कुटुंबाने तरुणीला कारण विचारले असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आणि कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली.
पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना सांगितले की, आदित्य उपाध्याय आणि गौरव सिंग राजपूत हे दोघे तिच्या ओळखीचे आहेत. ती त्यांच्यासोबत सुवाली समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. मात्र तिथे गेल्यानंतर दोघांनी मला गुंगींचे औषध देऊन काहीतरी प्यायला दिले. ज्यामुळे मी बेशुद्ध पडली. त्यानंतर त्या दोघांनी मला सुवाली समुद्र किनाऱ्यावरून जहांगीरपुरा कॅनाल रोडवरील हॉटेल ग्रीनमध्ये नेले आणि तिथे माझ्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर त्या दोघांनी मला घरी सोडले.तरुणीने तिच्यासोबत घडलेली प्रसंग सांगितल्यावर तिच्या कुटुंबियांनी तत्काळ जहांगीरपुरा पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून जहांगीरपुरा पोलिसांनी रात्री उशिरा आदित्य उपाध्याय आणि गौरव सिंग राजपूत या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दोघांपैकी आदित्य उपाध्याय हा भाजपा सुरत शहरातील वॉर्ड क्रमांक 8 मध्ये महामंत्री पदावर कार्यरत आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपाने तत्काळ आदित्य उपाध्यय याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.