Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोर्श केस अपघात केसनंतर ससूनचे डॉक्टर अजय तावरे पुन्हा कचाट्यात ; किडनी रॅकेटमध्येही सहआरोपी

पोर्श केस अपघात केसनंतर ससूनचे डॉक्टर अजय तावरे पुन्हा कचाट्यात ; किडनी रॅकेटमध्येही सहआरोपी
 

पुणे: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या बड्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या किडनी रॅकेटप्रकरणी आता आणखी एक मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. पुण्यातील राज्य शासनाचं रुग्णालय असलेल्या ससून हॉस्पिटलमधील एका बड्या माजी अधिकाऱ्याचाही यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं आता राज्य शासनापर्यंत याचे धागेदोरे पोहोचल्यानं यात आणखी काही महत्वाच्या घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

किडनी रॅकेटमध्ये ससूनचा डॉ. तावरे सहआरोपी

रुबी हॉल क्लिनीकमधील किडणी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरेचा सहभाग असल्याचे समोर आलं आहे. या डॉक्टरला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. सध्या तावरे पुण्यातील बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणात, मागील वर्षभरापासून येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे. अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही लवकरच गुन्हे शाखा तावरेचा ताबा किडणी रॅकेटमध्ये घेणार आहे. 

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेट प्रकरणात नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितीने तेव्हा डॉ. तावरेचा या प्रकरणातील सहभाग निश्चित केला होता. तसा अहवालही सरकारकडं पाठविण्यात आला होता. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता, फक्त रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ज्ञ, दलाल, रुग्ण आणि दात्यावर दाखल झाला होता.


तावरे असा आला जाळ्यात
किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे हा एफआयआरमधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान, जुन्या गुन्हयांचे निर्गतीकरण करताना पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्हयातील समितीचा अहवाल वाचणात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळं पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. तेव्हा डॉ. तावरे याचीच किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका असल्याचं उघड झालं.

तावरे याला किडणी देणारे आणि किडणी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होतं. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडणी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. रिजनल अ‍ॅथोराझेशन कमिटीचा तावरे अध्यक्ष होता. आठ सदस्यांची समीती तावरेच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडणी रॅकेट राज्यात गाजले तेव्हा ससूनच्या या समीतीबाबत देखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनानं हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली दहा लोकांची समिती नेमली होती. या समितीनं केलेल्या चौकशीत तावरेचा हा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रॅकेटमध्ये पंधरा आरोपी

किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारीका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उप संचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सिताराम कदम यांनी तक्रार दिली होती.

असा प्रकार आला उजेडात
यादरम्यान संबंधित रूग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पिटलमध्ये त्याची विचारपूस करण्यासाठी येत जात होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिनं तिच्या बहिणीला एजंट रवी भाऊनं पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवी भाऊनं केवळ 4 लाख रूपये देण्याचं मान्य केलं असल्याचं सांगितलं. परंतू, ठरल्याप्रमाणं पंधरा लाख रूपये न मिळाल्यानं त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला, यानंतर खरं प्रकरण उघडकीस आलं.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.