वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता हगवणे कुटुंबाच्या अजब कारनाम्यांनी राज्यभरात संतापाचा भडका उडवला आहे. सुनांना घरात मारहाण करणाऱ्या, क्रूरतेने वागणाऱ्या या कुटुंबाने बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, आणि तोदेखील बैलासमोर!
एप्रिल 2023 मध्ये मुळशी तालुक्यात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, गौतमी पाटीलने स्टेजवर थेट बैलासमोर नृत्य सादर केलं. स्टेजवर गौतमी समोर आणि बैल समोरच बांधलेला - हाच तो क्षण व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतो. या कार्यक्रमासाठी हगवणे कुटुंबाने मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. सुशील राजेंद्र हगवणे यांच्या 'युवा मंचा'च्या बॅनरखाली हा सोहळा पार पडला होता.
या कुटुंबाने घरातील सुनांवर केवळ मानसिक नाही तर शारीरिक छळ केल्याचे आरोप आहेत. वैष्णवीसह तिच्या जावेला देखील सतत त्रास दिला गेला. घरातून बाहेर पडलेली मोठी सून मयुरी जगताप हिनेही घरातील वातावरण असह्य झाल्याने निर्णय घेतला होता. तिच्या मृत्यूनंतर आता असे उघड होत आहे की, हुंड्यासाठी छळ करणारे हेच कुटुंब जनावरासाठी लाखो रुपये खर्चून लावणीचा डान्स साजरा करत होते. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून लोकांच्या मनात संतापाचे वातावरण आहे.
या प्रकरणात पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा यांना आधीच अटक झाली आहे. कालच सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांनाही अटक करण्यात आली. वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणात आता मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या मुलावरही कुटुंबियांचा हक्क सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता तो मुलगा वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात आहे. या बाळासाठी लोकांमध्ये भावना उफाळून येत असून, समाज माध्यमांवर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.