क्षेत्र महाबळेश्वरमधील विहिरीत आढळली तलवार
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील पवित्र तीर्थस्थळ अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे ऐतिहासिक व पुरातन वास्तुंचा अभ्यास करत असताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना एका जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन शस्त्रे सापडली आहेत. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी या वस्तू विहिरीबाहेर काढल्या. क्षेत्र महाबळेश्वर येथे असलेल्या विहिरीत इतिहास अभ्यासकांना हा ठेवा सापडला. ही ऐतिहासिक ठेवा दुर्मिळ असल्याचे लक्षात येताच राहुल कदम यांनी याबाबतची माहिती गावातील प्रमुख व्यक्तींना दिली.
क्षेत्र महाबळेश्वर येथील धनेश नाना वाडेकर यांनी याबाबतची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना दिली. त्यानंतर पुरातत्व विभागासोबत संपर्क साधण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे व त्यांची टीम साताऱ्यातून महाबळेश्वरमध्ये आली. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जयवंत बिरामणे, अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीमध्ये उतरून बाहेर आणल्या. या विहिरींमधून धोप तलवारीचे झालेले तीन तुकडे व दोन शस्त्रे बाहेर काढले आहेत. याचे जतन व संवर्धन करून संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे.
अशी असते धोप तलवार
धोप तलवार ही मराठा सैनिकांची आणि खास करून मराठा राजांची एक प्रमुख तलवार होती. याला 'मराठा धोप' किंवा 'खंडा तलवार' देखील म्हटले जाते. ती कमी रुंदीची, जास्त लांब आणि सरळ किंवा वक्र पात्याची असायची. तसेच बंद मुठीची आणि मागील बाजूस गज असलेली असायची. मराठा धोप ही मराठा सैनिकांच्या शस्त्रसज्जतेतील एक प्रमुख शस्त्र होती. ऐतिहासिकदृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत मराठा युद्धनीती व शस्त्रांचा अभ्यास करून धोप तलवारी बनवल्या. या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे यांना फिरंगी देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असत. या तलवारींचे दोन, उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप- याचे पाते टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो दुसरा सरळ धोप- याचे पाते सरळ असते. अशा तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. याची लांबी 4 फूट असत शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र वापरले जात असल्याचे अभ्यासक मयुरेश मोरे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.