अजितदादा मी जे बोलतो ते खरं ठरत असतं. अशोकराव चव्हाण यांना मी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होताल असे सांगितले होते आणि ते झाले. मी केंद्रात मंत्री होतो तेव्हा दिल्लीच्या सेंट्रल हाॅलमध्ये नेहमी राजकारणावर चर्चा होत होत्या. आजही त्या होतात, तिथे माझे जे मित्र
आहेत, त्यांनी मला असे सांगितले आहे, की येत्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस
यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत घेऊन जाणार आहेत. त्यानंतर
राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर सोपवले जाणार आहे. त्यासाठी
माझ्याकडून तुम्हाला अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा, असे म्हणत माजी मंत्री
भास्कर पाटील खतगावकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना मुख्यमंत्री
पदासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यात धडाडीचे नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. मी शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केले. पण तुमच्या इतकी ऊर्जा, प्रशासनावरील पकड, विषयाचा अभ्यास आणि अठरा अठरा तास काम करण्याची शारीरिक क्षमता बघितली नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या चव्हाण वाडी येथे आज शेषराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर
कौतुकाचा वर्षाव केला. तुम्ही नांदेडमध्ये तिसऱ्यांदा आला आहात. माझ्या
पक्षप्रेवश सोहळ्याच्या कार्यक्रमात लेंडी धरणासाठी निधीची मी मागणी केली
होती, ती महिनाभरात तुम्ही पूर्ण केली. आता असेच लक्ष तुम्ही घातले तर दोन
वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ 50 हजार एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी
लागेल. लेंडी प्रकल्पा प्रमाणेच गोदावरी मनार सारखर कारखान्याचा प्रश्न
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मार्गी लावा, अशी मागणी
खतगावकर यांनी केली.
अशोकाच्या झाडाकडून अपेक्षा नाही..
अजितदादा तुम्ही तिसऱ्यादा नांदेड जिल्ह्यात आलात तेव्हा काही मागण्याचा मोह सुटत नाही, असे म्हणतांना अशोकाच्या झाडाकडून अपेक्षा नसते असे म्हणत अशोक चव्हाण यांना खतगावकर यांनी चिमटा काढला. अजित पवार यांचे कौतुक करताना तुमची काम करण्याची पद्धत अतिशय पाॅझीटीव्ह आहे. प्रशासनावरची पकड, विषयाचा अभ्यास आणि काम करण्यासाठीची शारीरीक क्षमता अतिशय कमी लोकांमध्ये दिसते. ती अजितदादा तुमच्यात आहे. इंद्रनील नाईक मुंबईचे दौरे कमी करा आणि गावागावात फिरा. दादा या सगळ्यांना आता फिरवा, असेही खतगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.परभणीची तुमची सभा मी ऐकली, ती क्लीप मी कार्यकर्त्यांना दाखवली. कार्यकर्त्याने कसं काम केलं पाहिजे, जनतेशी नाळ कशी जोडली गेली पाहिजे याचं मार्गदर्शन आणि त्यावर वाटचाल केली तर महाराष्ट्रात आपला पक्ष निश्चितच राज्यात नंबर एकचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनार धरणाला सिमेंट लाईनिंग केले तर नांदेड जिल्ह्यातील चार-पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. चारपाचशे कोटींचा प्रश्न आहे, हे काम झाले तर कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली तालुक्याला याचा फायदा होऊन शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल, याचा पुनरुच्चारही खतगावकर यांनी केला.गोदावरी मनार कारखान्यासाठी अमित शहांना आपण बोलावे. तुमच्याकडूनच अपेक्षा कारण तुम्ही ते करता अशोकाच्या झाडाकडून ती अपेक्षा नाही. माझं भाकित खरं होतं, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री व्हाल असं बोललं होतो, ते झाले. येणाऱ्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल. त्यानंतर माझ्या वतीने पहिला सत्कार तुमचा केला जाईल, त्यासाठी तुम्ही यावे, असे निमंत्रण मी आजच देतो. तुळजापूरची कुलस्वामीनी तुळजाभवानी तुम्हाला निश्चितच ही संधी देईल, असेही खतगावकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.