Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! बचत गट ते पदमंजुरी, फडणवीस सरकारने घेतले 'हे' 10 मोठे मंत्रिमंडळ निर्णय, जाणून घ्या

Breaking News ! बचत गट ते पदमंजुरी, फडणवीस सरकारने घेतले 'हे' 10 मोठे मंत्रिमंडळ निर्णय, जाणून घ्या
 

राज्य मंत्रिमंडळाने पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे दोन न्यायालय स्थापन करण्याचा आणि पदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज २९ जुलै रोजी घेतला आहे. यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकूण दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात कालच २८ जुलैला जॉर्जिया येथे झालेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख (नागपूर) हिच्या अभिनंदनाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळाचे निर्णय (संक्षिप्त स्वरुपात)
1. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग)

2. बचत गटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध होणार

3. 'उमेद'- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार. (ग्राम विकास विभाग)

4. 'ई-नाम' योजनेची प्रभावी अंमलबजावणी

'ई-नाम' योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार व पणन विभाग)

5. गोंदिया, रत्नागिरी, वाशिममध्ये विशेष न्यायालय

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (विधि व न्याय विभाग)

6. पिंपरी चिंचवडमध्ये 2 न्यायालय स्थापन होणार, पदांनाही मंजुरी

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी. (विधि व न्याय विभाग)

7. वर्धा जिल्ह्यातील बार प्रकल्पाला मोठा निधी

वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

8. वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प नुतणीकरणासाठी निधी

वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी ) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

9. ॲडव्होकेट अकॅडमीसाठी जमीन देण्यास मान्यता

महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता. (महसूल विभाग )

10. विश्वविजेत्या दिव्य देशमुखचा सत्कार होणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर.

'ग्रँड मास्टर' दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून गौरव होणार!
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून 'ग्रँड मास्टर' किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून, आतापर्यंत विविध स्पर्धांत 23 सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे 35 पदके पटकावली आहेत.

दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे. दिव्या आणि कोनेरू हम्पी यांच्या चाली या तोडीस तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँड मास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे.

दिव्या आणि कोनेरू यांचे हे यश देशातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे असून, भारताच्या क्रीडा लौकिकात मोलाची भर घालणारे आहे. दिव्याच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे तसेच कुटुंबीयांचे योगदानही मोठे आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या या विश्वविजयी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या असून, येणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही दिव्या असा विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.