मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयेश तन्ना यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने एक मोठी कारवाई केली आहे. जयेश तन्ना यांच्यावर सामान्य रहिवासी, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान ईडीने आतापर्यंत तब्बल ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये लंडनमधील एका आलिशान बंगल्याचाही समावेश आहे.
फसवणुकीचे स्वरूप
जयेश तन्ना यांच्या साई ग्रुपवर अंधेरीतील डी.एन. नगर, कांदिवली आणि गोरेगाव येथील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. साई ग्रुपने गुंतवणूकदारांची तब्बल ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (EOW) तन्ना आणि त्यांचे भाऊ दीप यांच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
ईडीची कारवाई
ईडीने मार्च महिन्यात साई ग्रुपशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे आणि बेकायदेशीर संपत्तीचे तपशील समोर आले होते. तसेच भारतातील आणि भारताबाहेरील मालमत्तांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने जून महिन्यात सुमारे ३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईनंतर जयेश तन्ना यांची लंडनमध्येही मालमत्ता असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. यानंतर तात्काळ कार्यवाही करत गेल्या आठवड्यात ईडीने लंडनमधील तन्ना यांचा सव्वादोन कोटी रुपये किंमतीचा आलिशान बंगला जप्त केला. हा बंगला घोटाळ्यातील रकमेतूनच खरेदी करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत ईडीने तन्ना यांची एकूण ३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.
तपास सुरु
ईडीच्या तपासात आरोपींनी बेकायदेशीररित्या मिळवलेली मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. या छाप्यांमध्ये कागदोपत्री आणि डिजीटल स्वरूपातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडी या प्रकरणी अधिक तपास करत असून, तन्ना यांच्या परदेशातील आणखी मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.