Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आंदोलकावर दुःखाचा डोंगर; मुंबईत लढत असताना गावी पत्नीसह ५ जणांचा अपघाती मृत्यू

मराठा आंदोलकावर दुःखाचा डोंगर; मुंबईत लढत असताना गावी पत्नीसह ५ जणांचा अपघाती मृत्यू
 

छत्रपती संभाजीनगर/जालना: मराठा आरक्षण आंदोलनात  सहभागी होण्यासाठी मुंबईत गेलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथील सोपान डकले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार विहिरीत कोसळून  झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या पत्नी, भाऊ, सासू, दोन मेहुण्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी-राजूर मार्गावरील गाढेगव्हाण पाटीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सोपान डकले यांची पत्नी निर्मला डकले यांना अर्धांगवायूचा  त्रास होता. उपचारासाठी त्यांना घेऊन त्यांची आई पद्माबाई भांबिरे आणि दीर ज्ञानेश्वर डकले शुक्रवारी पहाटे सुलतानपूरकडे निघाले होते. त्यांच्यासोबत निर्मला यांचे भाऊ ज्ञानेश्वर भांबिरे आणि चुलत भाऊ अजिनाथ भांबिरेही होते. ते सर्वजण कारमधून जात असताना, गाढेगव्हाण पाटीजवळ अचानक दोन व्यक्ती मॉर्निंग वॉक करताना त्यांच्या गाडीसमोर आले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट ७० फूट खोल विहिरीत कोसळली. या घटनेत कारमधील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारे भगवान बनकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, विहीर खूप खोल असल्याने मृतदेह बाहेर काढणे अवघड होते. त्यानंतर पैठण येथील खासगी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच मराठा आंदोलक सोपान डकले हे मुंबईहून गावी परत येत आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे:
- निर्मला सोपान डकले (वय २५)
- ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले (वय ४०)
- ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे (वय ५५)
- पद्माबाई लक्ष्मण भांबिरे (वय ५५)
- अजिनाथ तुळशिराम भांबिरे (वय ४०)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.