Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आंदोलनाचा सीएसएमटी स्थानकाला फटका, प्रशासनाचे नियोजन ढासळले

मराठा आंदोलनाचा सीएसएमटी स्थानकाला फटका, प्रशासनाचे नियोजन ढासळले
 

मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय व जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या सीएसएमटी स्थानकाला मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या या स्थानकावर दररोज जवळपास शेकडो आंदोलक मुक्काम करीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोमवारी (ता. १) या स्थानकाचे संचालन सुरळीत ठेवणे, हे मध्य रेल्वेपुढचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. गर्दी व अस्वच्छतेमुळे स्थानकाचे नियोजन संपूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे.




मराठा आरक्षणाचे घडामोडीचे केंद्र हे सीएसटीएम स्थानक ठरले आहे. कार्यकर्ते दिवसभर आझाद मैदानावर असतात आणि रात्री विश्रांतीसाठी सीएसएमटी स्थानकावर आश्रय घेतात. या आंदोलकांसाठी विविध सामाजिक संस्था जेवण, नाश्ता व फळांचे वाटप करीत आहेत; मात्र या उपक्रमामुळे स्थानकाच्या आवारात कचऱ्याचे ढीग लागले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. 
 
स्थानकावर फक्त २०० स्वच्छता कर्मचारी नियुक्त असले तरी एवढ्या गर्दीत स्वच्छतेचे काम करणे अशक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी कचरा साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यातच स्थानकावर अधिक गोंधळ वाढू नये, म्हणून रेल्वेने मोटरमन यांना स्थानकात गाड्या आणताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आंदोलकांची गर्दी फलाटावर येत असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जात आहे.


'आरपीएफ'चे जवानांची संख्या कमी
गणेशोत्सवामुळे करी रोड, चिंचपोकळी, कॉटन ग्रीन, दादर या स्थानकांवर तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फलाटावर आरपीएफच्या जवानांना बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहे. त्यामुळे सीएसटीएम स्थानकावर जवानांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेने सोमवारच्या नियोजनासाठी राज्य सरकारकडे ३५० अतिरिक्त जवानांची मागणी केली आहे.
सोमवार परीक्षेचा दिवस

गणेशोत्सवाची सुट्टी तसेच शनिवार, रविवार आल्यामुळे मराठा आंदोलकांची धग तेवढी जाणवली नाही; मात्र सोमवारी कार्यालये सुरू होत असल्यामुळे रेल्वेस्थानकावरची परिस्थिती गंभीर होणार आहे. त्यातच आंदोलक आणि प्रवाशांमध्ये वाद उभा राहिल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासन मनुष्यबळ देणार का?
सीएसएमटी स्थानकातील अस्वच्छता दूर करण्यासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये बैठक झाली आहे. पालिकेकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली; मात्र पालिकेने हात वर केल्याचे सांगण्यात येते. परिणामी, स्थानकाचे नियंत्रण हाताबाहेर गेल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.