आज राज्य निवडणूक आयोगाकडून एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे. मात्र, या पत्रकार परिषदेआधीच एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे.
पत्रकार परिषद होण्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील संगणकांची तोडफोड केल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कार्यालयात घडली आहे. मतदार नोंदणी आणि यादीतील त्रुटींविषयी जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडला.
नेमकं काय प्रकरण?
मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आणि विलंब होत असल्याच्या तक्रारी घेऊन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी उपलब्ध असल्याचे पाहून कार्यकर्ते अधिकच चिडले. संपूर्ण मतदारसंघाची कामे हाताळण्यासाठी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था असल्यामुळे संताप अनावर झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयातील संगणकांची तोडफोड केली. या घटनेमुळे निवडणूक कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसेचा इशारा
"आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. मतदार याद्या लवकरात लवकर दुरुस्त केल्या नाहीत, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र, निवडणूक यंत्रणा जर कोणाच्या दबावाखाली काम करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच 149 विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीतील त्रुटींविरोधात येत्या काळात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगावर विरोधकांचे बोट
दरम्यान, मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याआधी मतदार यादीतील सर्व चुका दूर करण्यात याव्यात, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेतील आयोगाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.