लग्नानंतर १४ वर्षांनी दुसऱ्यांदा बाबा झाला राम चरण! पत्नीला झाली जुळी मुलं, चिरंजीवी यांनी शेअर केली गुडन्यूज
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. राम चरण व उपासना कामिनेनी यांना जुळी मुलं झाली आहेत. अभिनेत्याचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी स्वत: पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आई व दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राम चरणला एक मुलगा अन् मुलगी अशी जुळी मुलं झाल्याची बातमी चिरंजीवी यांनी आनंद व्यक्त करत शेअर केली आहे. चिरंजीवी एक्स ( आधीचं ट्विटर ) पोस्ट शेअर करत लिहितात, 'राम चरण व उपासना यांना जुळी मुलं झाली आहे. ही बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना प्रचंड आनंद होतोय. आमच्या घरी चिमुकल्या मुलाचं आणि गोंडस मुलीचं आगमन झालेलं आहे. या दोन्ही बाळांचं आमच्या कुटुंबात स्वागत करणं ही त्यांचा आजोबा या नात्याने सुखद गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाला दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छांसाठी मन:पूर्वक आभार मानतो.'
राम चरणची बहीण सुष्मिता म्हणते, "२०२६ हे वर्ष आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूपच खास ठरलं आहे. ही नव्या वर्षाची एक सुंदर सुरुवात आहे. पुन्हा आत्या होणं..हा क्षण माझ्यासाठी खूपच खास आहे. चरण आणि माझी प्रिय उपसी ( उपासना ) तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन' राम चरण व उपासना यांच्या लग्नाला आता जवळपास १४ वर्षे झाली आहेत. दोघांनी २०१२ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर ११ वर्षांनी उपासनाने २० जून २०२३ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. क्लिन कारा कोनिडेला असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. त्यानंतर आता राम चरण व उपासना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. या दोघांना जुळी मुलं झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, राम चरण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. वैयक्तिक आयुष्यात राम चरण व उपासना कामिनेनी यांचा साखरपुडा डिसेंबर २०११ मध्ये झाला होता. त्यानंतर १४ जून २०१२ रोजी हैदराबादमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.