"वहिनी सावध राहा! पटेल, तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित.", सुषमा अंधारे यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला, पोस्ट चर्चेत
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथबद्ध झाल्या. शपविधीला केल्या जाणाऱ्या घाईवरुन संम्रिश्र प्रतिक्रिया समोर येत असताना शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
अंधारे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून सुनेत्रा यांना राजकारणातील संभाव्य धोक्यांची जाणिव करुन देताना नेतृत्व सिद्ध करण्याची हीच संधी असल्याचे म्हटले आहे. दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, आपण त्यांचा योग्य तो बंदोबस्त कराल, अशी अपेक्षाही अंधारे यांनी व्यक्त केली.
वहिना सावध राहा!
सुषमा अंधारे यांनी या पोस्टमधून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. “पटेल, तटकरे यासारख्याप्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही दादांच्या तालमीत तयार झाला आहात. याचा ठसा उमटविण्याची संधी नियतीने तुम्हाला दिली आहे. संधी मिळाल्यास महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते”, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत तुम्ही उपमुख्यमंत्री होत आहात, असे सांगताना ही संधी अनुकंपा तत्वावरची संधी नसून नेतृत्वगुणांना संधी देणारी संधी आहे हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ असल्याचे, अंधारे सुनेत्रा पवारांना उद्देशून पोस्टमध्ये लिहतात.
अंत्यविधी होताच राजकीय वारसदाराची चर्चा
कर्तृत्वान, दूरदृष्टी, निर्णय क्षमता आणि कामाचा आवाका असणाऱ्या अजित पवारांची उणीव कुणीही भरू शकणार नाही, असे म्हणणारे मातब्बर नेते त्यांची उणीव भरुन काढण्यासाठी कामाला लागलेत, अशा शब्दात अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली. हे सगळं अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे. मृत्यूला उणेपुरे ४८ तास उलटले नाहीत तोच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हे माणसाच्या नश्वरतेचे आणि क्षणभंगुरतेचे प्रमाण आहे, असे अंधारे पोस्टमध्ये लिहले आहे.
या आनंदाला दादा गमावलेल्या दुःखाची झालर
उपमुख्यमंत्री म्हणून होत असलेला आजचा शपथविधी हा भावनिक दृष्टिकोनातून चूक वाटत असल्याचे मत सुषमा अंधारे यांनी मांडले आहे. अजित पवारांनी उभं केलेल्या साम्राज्यावर कुठलीही वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला पाऊल उचलणे गरजेचेच असल्याचेही अंधारे पोस्टमध्ये नमूद करतात. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळत आहे, या आनंदाला दादा गमावलेल्या दुःखाची झालर आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे.दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, ते तुम्हाला देखील माहिती आहे. त्यांचा आपण योग्य बंदोबस्त कराल, अशी अपेक्षा त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली. विरोधक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्यास आघाडीवर असू पण, महिला म्हणून कोणी नाकेबंदी केल्यास आपल्या बरोबर असू, असे सांगत अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.