UPSC परिक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या; मात्र सत्य समोर येताच सर्वांना बसला धक्का
यूपीएससी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ६ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील शिखा गौतमने परीक्षेचा निकाल तपासला आणि त्यात तिचे नाव दिसताच तिने पुढची पडताळणी न करता आनंद व्यक्त करण्यास सुरूवात केली.
तिच्या या आनंदात कुटुंब, शेजारी-पेजारीही सहभागी झाली. एका शिपायाच्या मुलीने नागरी सेवेची सर्वोच्च परीक्षेत यश मिळवले म्हणून बुलंदशहरमध्ये शिखाची मिरवणूक काढण्यात आली. पण दोनच दिवसात जे सत्य समोर आले, त्यातून सर्वांनाच धक्का बसला.
शिखा गौतमने ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या निकालाची पीडीएफ फाईल तपासली होती. त्यात ११३ व्या क्रमाकांवर शिखा हे नाव पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र शिखा नावाच्या इतरही मुली असू शकतात, याची पडताळणी करण्याचे ती विसरली. ११३ वा क्रमांक पटकावणारी खरी शिखा हरियाणाच्या रोहतक येथे राहणारी आहे.बुलंदशहरच्या आंबेडकरनगर येथे राहणाऱ्या शिखा गौतमने निकाल पाहण्यात चूक केलीच, पण इतरांनीही अशीच चूक केली. शिखा यूपीएससीत यशस्वी झाल्याची बातमी शहरात वेगाने पसरली. मिरवणुकीची तयारी केली गेली. जवळपास १,२०० लोकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यात शिखाचे नातेवाईकही होते. त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.शिखाच्या भावाने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या बहिणीने यूपीएससीमध्ये ११३ वा क्रमांक पटकावला आहे. हा तिचा दुसरा प्रयत्न होता. ती पूर्वीपासूनच अभ्यासात हुशार आहे. तिला शिक्षक व्हायचे होते. माझे वडील शिपाई आहेत आणि माझी आई गृहिणी. माझ्या बहिणीचा मला अभिमान वाटतो.
मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण
विशेष बाब म्हणजे, शिखा गौतम यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेली होती. ही बाबही कुणाच्या लक्षात आली नाही, याचेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिखाने मागितली माफी
या घटनेचा उलगडा झाल्यानंतर आता शिखा गौतमने जाहीर माफी मागितली आहे. 'निकालाच्या पीडीएफमध्ये फक्त शिखा नाव पाहून माझा गैरसमज झाला होता. मी फक्त नाव तपासले आणि रोल क्रमांक पाहायचा विसरले', अशी प्रतिक्रिया शिखाने एएनआयशी बोलताना दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
