Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीड हादरलं! शेकडो नराधमांकडून माय-लेकीला बेदम मारहाण; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

बीड हादरलं! शेकडो नराधमांकडून माय-लेकीला बेदम मारहाण; माणुसकीला काळिमा फासणारी घटना


बीड : बीड जिल्ह्याच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटनाही समोर आली आहे. यात जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. 
शेकडो लोकांच्या गर्दीत एकटी महिला आणि रिक्षा चालक यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला. या संपूर्ण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ वरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी केलं आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबाने रात्री एक वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास नेकनूर बस स्थानक पासून बंकट स्वामी मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेल्या रिक्षात तीन ते चार महिला प्रवासी होते. रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याने किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. रिक्षामधील महिलांनी वाद सोडवायचा प्रयत्न केला असता महिलांना देखील मारहाण करण्यात आली. लहान मुलांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नेमका हा प्रकार कसा घडला? या संदर्भात पीडितांनी आपबीती सांगितली आहे.

घटनेची अधिक माहिती देताना मारहाण झालेल्या महिलेच्या मुलीनं सांगितलं की, माझ्या मामाला खाली पाडून मारत होते. आईच्या गळ्याला धरून रिक्षामधून खाली ओढून तिला देखील मारहाण केली. मला देखील तीन-चार चापटा मारल्या. त्यावेळी माझा लहान भाऊ खाली पडला आम्ही खूप घाबरलो होतो. असं मुलीनं सांगितलं.
रिक्षामधील महिला मीना लोखंडे यांनी सांगितलं की, आमच्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली. एकदम छोटा रस्ता होता. त्यात त्यांनी गाडी घातली. रिक्षामधून ओढून काढत. जनावराला मारावं अशा पद्धतीने मारत होते. आम्ही ओरडत होतो. लहान बाळ माझ्याजवळ होतं. मुलगी सोडवायला उतरली तर तिला देखील मारहाण केलं. अगोदर पाच सहा जण होते पुन्हा नंतर खूप मोठ्या प्रमाणात जमाव जमला. दर्शनाला जात असताना हा आठ वाजता प्रकार घडला, असं मीना लोखंडे यांनी सांगितलं.
तर रिक्षा चालकाने घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. मठामध्ये सप्ताह चालू आहे. त्यामुळे मी तिकडे चाललो होतो. धक्का लागल्याने मला मारहाण केली. यावेळी माझ्या बहिणीलाही मारहाण केली. लहान लेकरांनाही त्यांनी सोडलं नाही, असं रिक्षा चालक रंजीत लोखंडे यांनी सांगितलं.

नेकनूर मधील घडलेल्या संपूर्ण प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ मिळाले आहेत. त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्पक्षपातीपणे चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये, सध्या नेकनूर मध्ये शांतता आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी दिली.
किरकोळ अपघाताच्या घटनेचे दगडफेकी मध्ये रुपांतर झाले. मात्र पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस स्टेशन समोर झालेला दगडफेकीचे व मारहाण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी आणि दोषीवर कारवाई करावी महिलांवर हात उचलणाऱ्यांना देखील कायद्याने धडा शिकव अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर असे प्रकार वारंवार घडत असलेले गावकऱ्यांनी आज आठवडी बाजार बंद ठेवून या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.