Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"तुमची जमीन शापित आहे!": अंधश्रद्धेचे जाळे विणून अशोक खरातने बळकावल्या जमिनी.

"तुमची जमीन शापित आहे!": अंधश्रद्धेचे जाळे विणून अशोक खरातने बळकावल्या जमिनी.


नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, त्याप्रमाणे अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे, महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातने कोणाकोणाला आणि कशा पध्दतीने फसविले, याची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे.

पीडिताला तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मृत्युची भीती दाखवून तो त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवित असे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील १५ ते २० लाखांची जमीन अशाच प्रकारे कवडीमोल भावामध्ये नावावर करून घेतांना खरातने जमीन मालकांना कशाप्रकारे मृत्युचा धाक दाखविला, त्याची माहिती पुढे आली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातने किती जणांना फसविले, किती महिलांवर अत्याचार केले, याची माहिती एसआयटीच्या तपासात उघड होऊ लागली आहे. एसआयटीला अशोक खरातकडून अजून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. परंतु, ती माहिती मिळत नसल्याने खरातला पोलीस कोठडी देण्याची विनंती दुसऱ्या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केल्याने खरातचा मुक्काम अजूनही पोलीस कोठडीत आहे. यादरम्यान, फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत आहेत. खरातने फसविण्यासाठी अवलंबिलेल्या पध्दतीमुळे तपास अधिकारीही थक्क झाले आहेत.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका कुटुंबाच्या जमिनीवर खरातचा डोळा होता. जमिनीची किंमत १६ लाखांपेक्षा अधिक असली तरी ही जमीन कमी किमतीत कशी मिळेल, याची योजना खरातने तयार केली. जमीन संबंधित कुटुंबाने विकावी, यासाठी खरातने पाठपुरावा सुरु केला. त्यासाठी खरातने कुटुंबाला, "तुमची जमीन शापित आहे. जमीन न विकल्यास कुटुंबात वाईट घटना घडतील", अशी भीती घातली. योगायोगाने, यादरम्यान, संबंधित जमीन मालकाच्या कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला.

या संधी हेरत खरातने, "जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो", अशी भीती दाखवली. जमीनपेक्षा घरातील सदस्यांचे प्राण अधिक महत्वाचे असल्याने जमीन मालक शेवटी भीतीने जमीन विकण्यास तयार झाला. अशाप्रकारे अत्यंत कमी किंमतीत खरातने त्याला हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याचे उघड होत आहे.
जमिनीच्या अनेक व्यवहारांमध्ये अशोक खरातबरोबर शहरातील दोन डॉक्टर राहात असत. एसआयटी पथकाने त्यांचीही चौकशी केल्याचे सांगितले जाते. संबंधित एका डॉक्टरचे राजकीय मंडळींशी संबंध असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने खरात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खरातला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या राजकीय मंडळींना, इतर नामवंतांचीही चौकशी करण्याची मागणी अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे एसआयटी आता मंत्री, आमदार यांनाही चौकशीला बोलविणार काय, याची उत्सुकता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.