नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होत असून त्याचा फटका आता भारतातील मद्य उद्योगालाही बसू लागला आहे. दारू, बिअर आणि वाइन तयार करणाऱ्या कंपन्यांनी विविध राज्य सरकारांकडे मद्याच्या किंमती वाढवण्याची मागणी केली आहे. काचेच्या बाटल्या, ॲल्युमिनियम कॅन आणि पॅकेजिंग साहित्याच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने जुन्या दरात व्यवसाय करणे कठीण झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
मद्य उद्योगातील प्रमुख संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनिज (CIABC) आणि ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) यांनी राज्य सरकारांना पत्र पाठवत दरवाढीस परवानगी देण्याची विनंती केली आहे. इनपुट कॉस्टमध्ये झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी बिअरच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव BAI ने मांडला आहे.
BAI मध्ये युनायटेड ब्रुअर्स, एबी इनबेव आणि कार्ल्सबर्गसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. देशातील बिअर बाजारपेठेतील जवळपास 85 टक्के हिस्सा या कंपन्यांकडे आहे. कंपन्यांच्या म्हणण्यांनुसार वाढत्या खर्चामुळे नफा सातत्याने कमी होत आहे आणि सध्याच्या जुन्या किंमतींवर व्यवसाय चालवणे अत्यंत अवघड बनले आहे.
फिरोजाबादच्या ग्लास हबमध्ये गॅस संकट
दारूच्या बाटल्यांच्या पुरवठा साखळीवर सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील ग्लास मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये झाला आहे. CIABC च्या माहितीनुसार गॅस टंचाईमुळे येथील कारखान्यांना आवश्यकतेच्या तुलनेत फक्त 60 टक्के गॅस मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांना महागडी स्पॉट LNG किंवा LPG खरेदी करावी लागत आहे. परिणामी काचेच्या बाटल्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही उत्पादन युनिट्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मद्य उद्योगातील पुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
ॲल्युमिनियम पुरवठा विस्कळीत, बिअर कॅन टंचाईची भीती
बिअर उद्योगासमोर सर्वात मोठे संकट ॲल्युमिनियमच्या पुरवठ्याचे निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेतून होणाऱ्या ॲल्युमिनियम आयातीवर युद्धजन्य परिस्थितीचा गंभीर परिणाम झाला आहे. सप्लायर्सनी इशारा दिला आहे की हा तणाव आणखी वाढला किंवा दीर्घकाळ कायम राहिला तर बिअर कॅनचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होऊ शकते. त्यामुळे अनेक उत्पादन प्रकल्प बंद करण्याची वेळ येऊ शकते अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम बाजारातील उपलब्धता आणि किंमतींवर होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांची करसवलतीची मागणी
वाढत्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी मद्य कंपन्यांनी राज्य सरकारांकडे अंतरिम दिलासाही मागितला आहे. BAI ने उत्पादन शुल्कात (Manufacturing Levy) प्रति लिटर सुमारे 3 ते 5 रुपयांची कपात करण्याची मागणी केली आहे. यामुळे ग्राहकांवर पडणारा संभाव्य दरवाढीचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.दुसरीकडे CIABC ने वाइन आणि इतर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यांच्या (IMFL) एक्स-डिस्टिलरी किंमतीत बदल करण्याची मागणी केली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दरांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे उद्योग क्षेत्राचे मत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.