सांगली :- 'क्रीम पोस्टिंग'साठी वशिलेबाजी की राजकीय वरदहस्त? पश्चिम महाराष्ट्रात मुदतवाढ मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा!
सांगली : कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, पण काही मलईदार ठाणी (क्रिम पोस्टिंग) असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. काही अधिकाऱ्यांची सांगली जिल्ह्यात बदली केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच मलईदार ठाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिल्याने मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतो.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये १३ पोलिस निरीक्षकांची बदली झाली आहे, चारजणांना मुदतवाढ दिली आहे, तर एका निरीक्षकाची विनंती बदली अमान्य केली आहे.
सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये ३४ सहायक निरीक्षकांची बदली, १७ सहायक निरीक्षकांना मुदतवाढ, तर ८ सहायक निरीक्षकांची विनंती बदली अमान्य केली आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये ४२ उपनिरीक्षकांची बदली, १७ उपनिरीक्षकांना मुदतवाढ, तर १४ उपनिरीक्षकांची बदली अमान्य केली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ८९ जणांची बदली, ३८ अधिकाऱ्यांना मुदतवाढ, तर २३ अधिकाऱ्यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.
रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे मोठे गॅझेट फुटले. पण या गॅझेटमध्य बदलीऐवजी अधिकाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीची खात्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांची सांगलीत बदली केली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणातून त्यांची सांगली जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात बदली केली असता त्यांची बदली पुन्हा सांगली जिल्ह्यात का? परिक्षेत्रातील कोणत्याही जिल्ह्यात बदली होण्याऐवजी त्या अधिकाऱ्यांची पुन्हा सांगली जिल्ह्यात बदली झाल्याने खात्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. महिनाभराचा अवधी लोटला तरी त्या बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अद्याप पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळाली नाही. पुणे ग्रामीणमध्ये बदली झालेले अनेक अधिकारी पाशाणमधील मुख्यालयात बसून आहेत. अशीच अवस्था इतर जिल्ह्यांतील आहे. त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने मुख्यालयामधील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी यापूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना आता तरी ठाणी मिळणार का, की त्यांना मुख्यालयातच बसवले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.