पुण्यात काळजाचा थरकाप! गॅसगळतीनंतर सिलेंडर बाहेर फेकतानाच देवघरातील दिव्यामुळे भीषण स्फोट; आई-वडिलांसह मुलाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
पुणे : खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी परिसरातील घरात सिलिंडर जोडत असताना रेग्युलेटरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन त्यात घरातील वृद्ध आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. सून आणि नात जखमी असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८०), वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) आणि पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५, सर्व रा. खांदवेनगर) अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पांडुरंग यांची पत्नी राजश्री (वय ३२ ) आणि मुलगी निहारिका (वय सहा) किरकोळ जखमी झाल्या आहेत. पांडुरंग एका आयटी कंपनीत अभियंता होते.
गॅस गळती होऊन स्फोट
शुक्रवारी सकाळी स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर संपल्याने वृंदाविनी गित्ते भरलेला सिलिंडर जोडत असताना गॅस गळती झाली. पांडुरंग आणि विष्णू गित्तेही तिथेच होते. रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. त्यात तिघेही गंभीररीत्या भाजले. शेजाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले. खराडी, धानोरी, येरवडा आणि 'पीएमआरडीए'च्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
आधी मुलगा, मग वडील, अखेर आईचाही मृत्यू
ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाला. दुपारी तीन वाजता विष्णू गित्ते आणि साडेपाचला वृंदाविनी गित्ते यांचा मृत्यू झाला. आई-वडील आणि मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.
घराचे मोठे नुकसान
स्फोटामुळे किचन, स्वच्छतागृह, शौचालय, हॉलमधील गीझर, खिडक्या, दारे, फर्निचर जळून खाक झाले. आगीमुळे घरातील फरशा तुटून उखडल्या होत्या. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. अग्निशामक अधिकारी प्रमोद सोनवणे, दत्तात्रय सातव आदींच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
घर वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंब उद्ध्वस्त
गॅसगळती झाल्याचे लक्षात येताच घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी सिलिंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न गित्ते कुटुंबीयांनी केला. सिलिंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याच्या उद्देशाने त्यांनी किचनमधून हॉलमध्ये आणला अन् तेथील देवघरातील पेटत्या दिव्यामुळे काही क्षणांतच भीषण स्फोट झाला.
देवघरातील पेटत्या दिव्याने स्फोट
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसगळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर गित्ते कुटुंबीयांनी सिलिंडर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सिलिंडर स्वयंपाकघरातून उचलून हॉलमध्ये आणला होता. गॅलरीतून तो खाली फेकण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, हॉलमधील देवघरात दिवा पेटता होता. तोपर्यंत घरभर गॅस पसरल्याने दिव्याच्या ज्योतीचा संपर्क येताच गॅसने पेट घेतला आणि सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.या दुर्घटनेतून बचावलेल्या राजश्री गित्ते यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. घटनेवेळी त्या अंघोळ करीत होत्या. स्वयंपाकघरातून आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता गॅसगळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, त्या बाहेर येण्यापूर्वीच स्फोट झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.