१४ कोटींचा राजवाडा, २ विमाने बुक... लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; भावी पत्नीच्या वाढदिवशीच पुण्याचा नवरदेव हरपला


पुणे: कोणाचा मृत्यू कुठे लिहिला आहे सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार मावळ तालुक्यातील एका 25 वर्षीय तरुणासोबत घडला असून अगदीच विचित्र पद्धतीने आणि अनपेक्षितरित्या त्याने जगाचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजेच लग्न अगदी काही दिवसांवर आलेलं असतानाच या तरुणाला होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेलेला असतानाच मृत्यू झाला.

लोहगड किल्ल्यावर दुर्दैवी अपघात

अवघ्या काही दिवसानंतर लग्नाच्या बोलावर चढणार नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणार आणि होणाऱ्या पत्नीच्या हातात हात घालून संसाराची सुरुवात करणार पण नियतीला काही वेगळच मान्य होतं. मावळ तालुक्यातील गहुंजे येथील 25 वर्षीय केतन विशाल अग्रवालचा लोहगड किल्ल्यावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. केतनच्या मृत्यूने आनंदाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन हा त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता.

जयपूरला पार पडणार होता शाही विवाहसोहळा, विमानंही झालेली बूक
10 दिवसानंतर त्यांचा जयपूर येथील जयपूर पॅलेसमध्ये केतनचा शाही विवाह सोहळा पार पडणार होता. 14 कोटी रुपये खर्च करुन हा पॅलेस लग्नासाठी बूक करण्यात आलेला. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. जयपुरला जाण्यासाठी दोन विमानांचं बुकिंग झालं होतं, अलिशान पॅलेस आरक्षित करण्यात आला होता. कुटुंबीय नातेवाईकांनी मित्र परिवारात आनंदाचे वातावरण होतं. मात्र एका क्षणात सर्व काही बदलून गेलं.
नेमकं केतन सोबत घडलं काय?

गुरुवारी सकाळी लोहगड किल्ल्यावर केतन त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला होता. त्यावेळी फोटो काढत असताना केतनचा अचानक तोल गेला आणि पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा ग्रामीण पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली. यानंतर लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र' आणि 'वन्यजीव रक्षक, मावळ' संस्थेचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला वर काढलं पण...
जीव धोक्यात घालून अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव कार्य करण्यात आले. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत काळाने त्याच्यावर झडप घातली होती. या घटनेनंतर गहूंजे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबाबरोबरच मुलीच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला असून केतनचे मित्रांनाही मानसिक धक्का बसलाय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.