Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: नशेकरीता वापरली जाणारी ८४ 'मेफेन टरमाईन' इंजेक्शन्स जप्त; एक अटकेत​

सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: नशेकरीता वापरली जाणारी ८४ 'मेफेन टरमाईन' इंजेक्शन्स जप्त; एक अटकेत


​वैद्यकीय वापरासाठी असलेल्या औषधांचा नशेकरीता आणि उत्तेजक द्रव्य म्हणून बेकायदेशीर वापर करणाऱ्यांविरुद्ध सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांगलीवाडी टोलनाका परिसरातील फल्ले मंगल कार्यालयासमोरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई करत ८४ मेफेन टरमाईन इंजेक्शन्स आणि एका आयफोनसह एकूण ५६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राहुल सहदेव अडगळे (वय २३, रा. सांगलीवाडी) या संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी 'एलसीबी'ला कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक संशयितांचा शोध घेत होते.

​तपासादरम्यान पोलीस अंमलदार रणजित जाधव आणि ऋषिकेश सदामते यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सांगलीवाडी टोलनाका परिसरातील फल्ले मंगल कार्यालयासमोर एक इसम बेकायदेशीर नशायुक्त इंजेक्शन्स विकण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित राहुल अडगळे याला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडील कापडी पिशवीत 'ट्रेमीमाईड' (मेफेन टरमाईन सल्फेट) औषधी द्रव्याच्या ८४ इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या.
​'इंडिया मार्ट'वरून ऑनलाईन खरेदी, तरुणांना विक्रीची कबुली:

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. "मी ही मेफेन टरमाईन औषधी द्रव्ये गुगलवर सर्च करून 'इंडिया मार्ट' (India Mart) ॲप्लिकेशनवरून ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे मागवून घेतो," अशी कबुली त्याने दिली. ही इंजेक्शन्स तरुण वर्ग नशेकरीता आणि बॉडीबिल्डिंग/उत्तेजक द्रव्य म्हणून वापरत असल्याने, ती जादा दराने विकण्यासाठी आणल्याचे त्याने मान्य केले.

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
Mephentermine sulphate Injection (10 ml) ट्रेमीमाईड: ६० नग (किंमत रु. १९,५००/-)
​Mephentermine sulphate Injection ip hyper-30mg ट्रेमीमाईड: २० नग (किंमत रु. ७,४००/-)
​लेबल नसलेल्या काचेच्या बाटल्या: ४ नग
​आयफोन-११ मोबाईल: १ नग (किंमत रु. ३०,०००/-)
​एकूण मुद्देमाल: रु. ५६,९००/-
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकों रणजित रघुनाथ जाधव यांनी फिर्याद दिली असून, सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७८ सह औषधीद्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० चे कलम १८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही  कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार तसेच अंमलदार रणजीत जाधव, अतुल माने, संकेत मगदुम, संदीप पाटील, सुशिल मस्के, अभिजीत माळकर, संकेत कानडे, विनायक सनदी, ऋषिकेश सदामते, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी (LCB) आणि सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी, अभिजीत पाटील यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.