सांगली पोलिसांचे जिल्हावासीयांना आवाहन: सतर्क राहा, सुरक्षित राहा; ऑक्टोबर ठरणार 'सायबर जनजागृती महिना'!
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर ज्या झपाट्याने वाढत आहे, त्याच प्रमाणात ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी सतर्क, माहितीपूर्ण आणि सुरक्षित राहावे या उद्देशाने, 'इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर' (14C) व 'महाराष्ट्र सायबर' यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोबर २०२६ हा महिना संपूर्ण जिल्ह्यामध्ये "सायबर जनजागृती महिना" म्हणून साजरा करण्यात येत आहे.
मा. पोलीस अधीक्षक आणि मा. अपर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत तळागाळापर्यंत पोहोचणारी एक व्यापक जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना सध्या घडणाऱ्या विविध प्रकारच्या ऑनलाईन फ्रॉडची (उदा. ओटीपी फ्रॉड, टास्क फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन लोन ॲप्स) माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडसू नये यासाठी जिल्हाभरात प्रत्यक्ष कार्यक्रम, कार्यशाळा आणि मेळावे आयोजित केले जाणार आहेत.
प्रत्यक्ष कार्यक्रमांसोबतच सांगली पोलीस दलाच्या अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही माहितीपूर्ण डिजिटल पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करून सायबर साक्षरता पसरवली जाणार आहे. या मोहिमेबाबत आवाहन करताना सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांनी सांगितले की, "प्रत्येक नागरिकाने एक जबाबदार, सतर्क आणि सायबर-सुरक्षित डिजिटल नागरिक होण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि सांगली पोलिसांच्या या मोहिमेचा उद्देश यशस्वी करावा."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.