सांगलीत खाकीचा धाक संपला? एसपींच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ‘हॉटेल अजवा’ पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू; विश्रामबाग पोलिसांचा मूक आशीर्वाद?


​सांगली :- शहर आणि परिसरात रात्री ११ वाजता हॉटेल्स बंद करण्याचे कडक नियम सर्वसामान्यांना लागू असताना, सांगली-मिरज रस्त्यावरील कॉलनी रोड येथे असलेल्या ‘हॉटेल 'अजवा’ला पोलीस प्रशासनाकडून वेगळा न्याय लावला जात आहे का, असा संतप्त सवाल आता सांगलीकर विचारत आहेत. पोलीस अधीक्षकांच्या (SP) शासकीय निवासस्थानापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेले हे हॉटेल दररोज पहाटे ३:३० ते ४ वाजेपर्यंत उघडेच असते. मात्र, नाईट राऊंडला असणाऱ्या विश्रामबाग पोलिसांना याचा कसलाच थांगपत्ता लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून यात नक्की कोणाचा ‘आशीर्वाद’ आहे, अशी जोरदार चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

​रात्री ११ नंतर 'बॅकडोअर एंट्री': आतमध्ये खाबूगिरी सुरूच!
​मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल अजवा प्रशासनाकडून रात्री ११ वाजता नियमानुसार केवळ दर्शनी भागाचा दरवाजा आणि लाईट्स बंद केल्याचे नाटक केले जाते. परंतु, प्रत्यक्षात हॉटेलचा मागील किंवा अंतर्गत विभाग पूर्ण क्षमतेने सुरूच असतो. पहाटे ४ वाजेपर्यंत या ठिकाणी जेवणाची आणि इतर सेवांची ऑर्डर बिनदिक्कतपणे पुरवली जाते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दररोजचा नित्यक्रम बनला असून, गस्तीवर असणाऱ्या पोलिसांचे याकडे होत असलेले ‘अक्षम्य दुर्लक्ष’ संशयास्पद मानले जात आहे.

​पोलिसांचे अभय कोणाला? निष्पाप व्यावसायिकांवर कारवाई, मग अजवाला सूट का?

​नाईट राऊंडला असणारे पोलीस इतर लहान-मोठ्या हॉटेलचालकांना रात्री ११ वाजत नाहीत तोच दुकाने बंद करण्यास भाग पाडतात. मात्र, गेस्टहाऊस समोरील या आजवा हॉटेलवर कारवाई करण्याचे धाडस विश्रामबाग पोलीस का दाखवत नाहीत? कायद्याचे रक्षकच जर अशा बेकायदेशीर गोष्टींकडे डोळेझाक करणार असतील, तर पोलिसांचा धाक उरलाय कुठे? पोलीस अधीक्षकांच्या घरा शेजारीच जर असा प्रकार घडत असेल, तर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी झोपले आहेत का, असा तिखट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
​एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे दाखले दिले जात असताना, दुसरीकडे पहाटेपर्यंत चालणाऱ्या अशा हॉटेलमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित हॉटेलवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि या हॉटेलला अभय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.