स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; विनापरवाना दोन पिस्तुल बाळगणाऱ्या दोन आरोपींना मिरजेत अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
सांगली :- सांगली जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मिरजेतील भारतनगर ख्रिश्चन दफनभूमी परिसरात छापा टाकून पोलिसांनी विनापरवाना २ देशी बनावटीची पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि एक चारचाकी कार असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र पुरवणारा कर्नाटकातील एक आरोपी फरार आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उप-निरीक्षक महादेव पोवार यांचे पथक अवैध शस्त्रांविरोधात मोहीम राबवत होते. या दरम्यान, पोलीस अंमलदार अमोल पैदाळे आणि रोहन घस्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरज येथील भारतनगर ख्रिश्चन दफनभूमी परिसरात एका काळ्या रंगाच्या हुंदाई व्हेन्यू कारमध्ये दोन संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून बसले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेत निगराणी सुरू केली आणि संशयित वाहनाला पंचांसमक्ष घेराव घालून दोन जणांना ताब्यात घेतले.
अंगझडतीत सापडली दोन पिस्तुल आणि जिवंत काडतुसे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता:दर्शन अनिल कांबळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) याच्या पॅन्टच्या पाठीमागील बाजूस एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये १ जिवंत काडतूस आढळले.शेखर महावीर लोंढे (वय २९, रा. माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, मिरज) याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूस दुसरे देशी बनावटीचे पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस मिळून आले. शस्त्रे बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकातून खरेदी केली होती शस्त्रे
अधिक चौकशी केली असता, दर्शन कांबळे याने हे पिस्तूल शेखर लोंढे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शेखर लोंढे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने ही दोन्ही पिस्तूलं त्याचा ओळखीचा आकाश ढिगे (रा. कोपल, जि. गदग, राज्य कर्नाटक) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल:
१. देशी बनावटीची २ पिस्तुलं: किंमत रु. १,००,०००/-२. २ जिवंत काडतुसे (राऊंड): किंमत रु. १,०००/-३. हुंदाई व्हेन्यू कार (MH 10 ER 1009): किंमत रु. ८,००,०००/-एकूण जप्त मुद्देमाल: रु. ९,०१,०००/- (नऊ लाख एक हजार रुपये)महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपोलीस अंमलदार रोहन सुभाष घस्ते यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०१/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी आकाश ढिगे याचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महादेव पोवार, सपोनि अमित परीट, अनिल ऐनापुरे, अंमलदार अमोल पैदाळे, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, रणजित जाधव, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, विनायक सनदी, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.