सीएनजी पंपावर कारमध्ये गॅस भरत असतानाच अचानक झालेल्या भीषण स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गुजरातमधील वडोदराजवळील करजण येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील सीएनजी पंपावर ही दुर्घटना घडली.
गॅस भरत असताना कारचा सीएनजी टँक अचानक फुटला आणि क्षणार्धात कार उद्ध्वस्त झाली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की कारचे धातूचे तुकडे आणि काचा काही मीटर अंतरावर जाऊन पडल्या. सुदैवाने त्यावेळी कारमध्ये कोणीही बसलेले नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेने सीएनजी भरताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष न करण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे.
ही घटना करजणजवळील जिंदाल कंपनीसमोर असलेल्या सीएनजी पंपावर गुरूवारी (दि. ०१) दुपारच्या सुमारास घडली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सीएनजी पंपावर एका कारमध्ये गॅस भरला जात असल्याचे दिसते. याचदरम्यान अचानक जोरदार स्फोट होतो. स्फोटानंतर कारचा वरील भाग मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होतो. काचा आणि कारचे काही तुकडे आजूबाजूला विखुरले जातात. स्फोटाचा फटका जवळ उभ्या असलेल्या अन्य दोन वाहनांनाही बसला असून त्यांचेही नुकसान झाले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे पंपावर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणखी कोणती दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. सीएनजी टँक नेमका कशामुळे फुटला, याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
कारमध्ये कोणी नसल्याने टळला मोठा अनर्थ
स्फोट झाला तेव्हा कारमध्ये चालक किंवा प्रवासी बसलेले नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सीएनजी भरताना प्रवाशांनी वाहनाबाहेर उतरावे, हा सुरक्षेचा महत्त्वाचा नियम आहे. या घटनेतही कार रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सीएनजी भरताना कोणती काळजी घ्यावी?
सीएनजी हा उच्च दाबाने भरला जात असल्याने गॅस भरताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.१. इंजिन बंद करा : सीएनजी भरायला सुरुवात करण्यापूर्वी कार योग्य ठिकाणी उभी करून इंजिन पूर्णपणे बंद करा.२. कारमधून सर्वांनी बाहेर पडा : गॅस भरताना चालकासह सर्व प्रवाशांनी कारच्या बाहेर उभे राहावे.३. दर ३ वर्षांनी Hydro Test करा : महानगर गॅसने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी सिलेंडरची दर ३ वर्षांनी हायड्रो टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. ही चाचणी PESO मान्यताप्राप्त एजन्सीकडूनच करून घ्यावी. त्यामुळे सिलेंडर वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, हे तपासता येते.४. OEM किंवा RTO मान्यताप्राप्त एजन्सी निवडा : सीएनजी किट बसवताना किंवा सिलेंडरची तपासणी करताना केवळ वाहन उत्पादकाने (OEM) किंवा RTOने मान्यता दिलेल्या अधिकृत एजन्सीचीच निवड करा. अनधिकृत ठिकाणी सीएनजी किटमध्ये बदल करणे टाळा.५. Compliance Plate तपासा : वाहनातील सीएनजी यंत्रणा आवश्यक सुरक्षा निकष पूर्ण करते की नाही, हे दर्शवणारी वैध Compliance Plate आहे का, याची खात्री करा.६. गॅसचा वास आला तर फिलिंग थांबवा : सिलेंडर किंवा पाइपमधून गॅस लीक होत असल्याचा संशय आल्यास तातडीने पंप कर्मचाऱ्याला सांगा. स्वतः पाइप किंवा सिलेंडर उघडण्याचा प्रयत्न करू नका.७. मोबाइल, सिगारेट आणि लायटर टाळा : सीएनजी पंपावरील सुरक्षा सूचनांचे पालन करा. आग किंवा ठिणगी निर्माण होण्याचा धोका असलेल्या वस्तूंचा वापर करू नका.८. सिलेंडरची वैधता तपासा : सीएनजी सिलेंडरची वैधता आणि तपासणीची तारीख वेळोवेळी तपासा. वैधता संपलेल्या किंवा तपासणी न झालेल्या सिलेंडरचा वापर टाळा.करजण येथील या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी स्फोटाचा व्हिडिओ सीएनजी वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देणारा ठरत आहे. नियमित तपासणी आणि गॅस भरताना आवश्यक खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटनांचा धोका कमी करता येऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.