जावयाला २ कोटींची डिफेंडर, १५० पदार्थांची मेजवानी! आमदाराच्या मुलीच्या थाटमाट लग्नाची जोरदार चर्चा; मोदींपासून लालूपर्यंत सर्वांना निमंत्रण

चार लाख पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था, १५० हून अधिक खाद्यपदार्थ, भव्य मंडप आणि जावयाला महागडी आलिशान गाडी भेट... बिहारमधील आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा रंगली आहे.

या विवाहसोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारच्या मोकामा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी हिचा विवाह २५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या नदावां या मूळ गावी होणार आहे. या सोहळ्यासाठी अनंत सिंह यांच्या कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाच्या आयोजनापासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येत आहे.

जावयाला लँड रोव्हर डिफेंडरची भेट?

या लग्नातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे ती जावयाला दिली जाणारी महागडी गाडी. अनंत सिंह यांचे होणारे जावई ऋषिकेश कुमार हे मूळचे बिहारमधील बिहटा परिसरातील रहिवासी असून सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी अनंत सिंह यांनी लँड रोव्हर डिफेंडर ही आलिशान एसयूव्ही खरेदी केल्याची चर्चा आहे.

ही गाडी पाटण्यात दाखल झाली असून अनंत सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर उभी असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या गाडीची किंमत मॉडेलनुसार साधारण दीड ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर डिफेंडरच्या अधिक महागड्या व्हेरिएंटची किंमत जवळपास तीन कोटी रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी ही गाडी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दहा बिघा जमिनीवर भव्य मंडपाची उभारणी

शिवांगीच्या विवाहासाठी तब्बल दहा बिघा जमिनीवर मंडप आणि तंबू उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील मऊ येथून कामगार बोलावण्यात आल्याची माहिती आहे. पाहुण्यांच्या निवासाची, वाहतुकीची आणि सुरक्षेची स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. याशिवाय दुबईतून सहा मॉडेल्स येणार असल्याचीही चर्चा आहे. बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदींपासून लालू-नितीश यांच्यापर्यंत निमंत्रण

या विवाहसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या नेत्यांना आमंत्रित करण्याची अनंत सिंह यांची तयारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. प्रेम कुमार यांना आधीच निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

चार लाख पाहुण्यांसाठी १५० पदार्थांची मेजवानी

या लग्नातील भोजन व्यवस्थेनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. आयोजनाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास चार लाख पाहुण्यांसाठी जेवणाची तयारी केली जात आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा १५० हून अधिक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. त्यामुळे शिवांगीच्या लग्नातील पाहुणचार आणि भव्य आयोजनाची सध्या बिहारसह देशभरात चर्चा सुरू आहे.

भव्य सजावट, नामवंत कलाकारांना आमंत्रित

या विवाह सोहळ्यात भव्य सजावट, आकर्षक जयमाला स्टेज हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या शाही विवाह प्रसंगी भोजपुरी आणि बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांना आमंत्रित केले जाण्याची चर्चा आहे. यामध्ये पवन सिंह, अक्षरा सिंह, उदित नारायण आणि सोनू सूद यांसारख्या चर्चित नावांचा समावेश आहे. या विवाह सोहळ्याचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे घोडेस्वारी स्पर्धा असणार असून, यासाठी एक विशेष मैदान तयार केले जात आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणासह विविध राज्यांतील घोडस्वार उपस्थित राहणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.