मालकाला कर्जमुक्त करणाऱ्या 'गज्या'बैलाचं निधन; वज्रदेहामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होती नोंद
गज्या' म्हणजे बैल नव्हे जणू हत्तीचं -
सहा फूट उंची, दहा फूट लांबी आणि तब्बल एक टन वजन असा अवाढव्य बैल म्हणजे 'गज्या'. सांगलीजवळ असणाऱ्या कसबे डिग्रज येथील कृष्णा सायमोते यांच्याकडे असणारा हा बैल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. अवाढव्य शरीरयष्टी लाभलेल्या गज्या बैलाला बघणारे आपोआप अचंबित होतात. याला पाहून अनेकजण, गज्या जणू बैल नसून तो हत्तीच आहे असं आपसूक बोलत होते.
मालकाला कर्जमुक्त करणारा गज्या -
कृष्णा सायमोते यांनी या गज्याचा अगदी आपल्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे सांभाळ केला होता. त्याच्या खाण्यापिण्यापासून अगदी सर्व गोष्टींची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेत होते. गज्या हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. राज्यातल्या अनेक प्रदर्शनांमध्ये गज्या हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असे, अशा या गज्याने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. इतकेच नव्हे तर गज्याने आपल्या कर्जबाजारी असणाऱ्या मालकाला देखील आपल्या शरीरयष्टीच्या जोरावर कर्जमुक्त केलं होतं. अनेकांनी गज्याला लाखो रुपयात विकत देखील मागितलं होतं. मात्र, गज्यावर प्रेम असणाऱ्या सायमोते कुटुंबांनी त्याचा अखेरपर्यंत सांभाळ केला.
गज्याने घेतला अखेरचा निरोप -
बुधवारी कसबे डिग्रज याठिकाणी गज्याने अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षांपासून सायमोते कुटुंब गज्याला सांभाळत होते. अखेर बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. निधनानंतर सायमोते कुटुंबांनी रितीरिवाजाप्रमाणे गज्याचा अंत्यविधी पार पाडला. गावातून निघालेल्या गज्याच्या अंत्ययात्रेत शेकडो बैलप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. अवाढव्य देह आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा गज्या बैल हरपला आहे. गज्याची आठवण म्हणून अवाढव्य देह असलेल्या गज्याच्या हाडांचा सांगाडा संग्रहालयात ठेवण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करण्याचा मानस कृष्णा सायमोते यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.