Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोणा संकटाच्या काळात देवदूत बनून रुग्णांना आधार दिल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कोरोणा संकटाच्या काळात देवदूत बनून रुग्णांना आधार दिल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त् दिल्या शुभेच्छा… 

सांगली, दि. 01, : कोरोना महामारीमध्ये  गेल्या दिड वर्षापासून जिवाची बाजी लावून अविरतपणे रुग्णांची सेवा करणारे, खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महामारीच्या काळात देवदूत बनून रुग्णांची सेवा केल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील, अशा शब्दात सर्व डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले.

1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांचे ऋण व्यक्त करुन शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्ण सेवा हीच खरी मानवतेची सेवा मानून कोरोना संकटाच्या काळात अखंड व अविरतपणे सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे  मी ऋण व्यक्त करतो. कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये काही डॉक्टरांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. काहींनी आपले कुटुंबीय गमावले आहेत. घरातील जीवलग व्यक्ती कोविडमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतरही सर्व दु:ख बाजूला सारुन कोरोना विरुध्दच्या लढाईत ते कर्तव्य  बजावत राहिले. या सर्वांच्या योगदानामुळेच आपण महाभयंकर कोरोनाशी यशस्वीपणे लढत आहोत. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेले योगदान मानव समाज कधीही विसरु शकणार नाही.

जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, शासकीय रुग्णालयांत उपचार करणारे असोत अथवा खाजगी रुग्णालयात असोत, प्रत्येकाने आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 हा अदृष्य शत्रू आहे . या शत्रूला मात देण्यासाठी डॉक्टरांचा कस लागत आहे. तरीही हार न मानता या योध्दांनी पहिली कोरोनाची लाट थोपवली. कोरोनाची दूसरी लाट परतीच्या मार्गावर आहे. संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीही जिल्हा प्रशासनाला डॉक्टर्स संपूर्ण साथ देतील.असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.