Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

 ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तिसऱ्यांदा समन्स बजावले असून ईडीने अनिल देशमुखांना आज (5 जुलै) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुखांनी त्यापूर्वीच ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून ईडीला रोखावे तसेच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, असे अनिल देशमुखांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

माझ्याविरुद्ध सुरु असलेली कारवाई कायद्याला धरुन नाही, पूर्वग्रहदूषितपणे सुरु असल्याचे मला जाणवत असल्यामुळे माझ्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले आहे. देशमुखांच्या या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होणार आहे.

जे घटनात्मक अधिकार मला आहेत, त्याचा वापर मला करता येईल अशी अपेक्षा आहे. मी आतापर्यंत अनेक वेळा ECIR ची प्रत मागितली, कागदपत्रे मागितली, पण ती मला दिली नसल्याचेही अनिल देशमुखांनी म्हटले आहे. शनिवारीच अनिल देशमुख दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी कायदेतज्ज्ञांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुखाची ईडी चौकशी करणार आहे. या आधी ईडीने अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर छापाही मारला होता.

ईडीने या आधी देखील अनिल देशमुखांना दोनदा समन्स बजावले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढते वय ही कारणे पुढे करुन अनिल देशमुखांनी ईडीला सध्यातरी चौकशी करु नये किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करावी अशी विनंती केली होती. तसेच देशमुखांनी ईडीकडून 5 जुलैपर्यंतची वेळ मागितली होती. ही वेळ आज संपत आहे. ईडीने 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना तिसऱ्यांदा समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान ईडीला अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पालांडे यांनी कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. ज्ञानेश्वरी येथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप परमबीर सिंह यांनी 4 मार्चला आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पालांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पालांडे यांच्या या कबुलीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.