Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या बासमती तांदळाचा, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

 भारताच्या बासमती तांदळाचा, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात



वी दिल्ली: भारतीय तांदूळ परदेशातील लोकांना आवडत असल्याचं समोर आलेलं आहे. परदेशातून भारतीय तांदळाची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढलेली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारतातून परदेशात तब्बल तीस हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. 46.30 लाख मेट्रिक टन तांदळाची निर्यात झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. देशातील तांदूळ पिकाचे क्षेत्र देखील सातत्याने वाढताना दिसत आहे.

भारताने चीन, पाकिस्तान, आखाती देश आणि अमेरिकेसह एकूण 125 देशांमध्ये बासमती तांदळाची निर्यात केली. मेरठ येथील बासमती निर्यात विकास प्रतिष्ठानचे मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश शर्मा यांनी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बासमती तांदळाची शेती केली जात असल्याची माहिती दिली. शेतकरी त्यांच्याकडील धान किंवा तांदूळ हे निर्यातदारांना विकतात, त्यानंतर निर्यातदार बासमती तांदळाची परदेशात विक्री करतात. शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह

बासमती तांदळाचा चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साह दिसत येत आहे. भारत सरकारने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांना बासमती तांदळाची लागवड करण्याची परवानगी दिली आहे. बासमती निर्यात विकास प्रतिष्ठान यांच्याकडून प्रमाणे झाल्यानंतरच बासमती तांदूळ परदेशात निर्यात केला जातो.

निर्यात होणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबद्दल दक्षता

परदेशात निर्यात करण्यात येणार्‍या बासमती तांदळाच्या गुणवत्तेबाबत खास दक्षता पाळण्यात येते. भारत सरकार द्वारा अधिसूचित करण्यात आलेल्या राज्यांमधील बासमती तांदूळ परदेशात निर्यात केला जातो. कारण, काही राज्यांमध्ये बासमती तांदळाच्या बियाण्याची गुणवत्ता कमी झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या प्रमाणात फायदा मिळत नव्हता.

बासमती तांदळाला किडीचा अधिक धोका

बासमती तांदळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ सातत्याने सतर्क राहायला सांगतात. कृषी विज्ञान केंद्र गौतम बुद्धनगरचे वैज्ञानिक डॉ. मयंक राय यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ठिकाणांमध्ये किडीचा धोकाही अधिक असतो असं सांगितलं. बासमती तांदळावर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बासमती तांदळाचे पीक वाचविण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. उत्तर भारतात गेल्या काही वर्षांपासून बासमती तांदळाच्या लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. बासमती निर्यात विकास प्रतिष्ठान शेतकऱ्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन सातत्याने करत असते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.