नव्या पिढीला भीती वाटतीय, लक्ष घाला', पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे तक्रार
मुंबई : 'रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात' अशी जहरी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. पडळकरांच्या टीकेनंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी पडळकरांविरोधात थेट पंतप्रधान मोदी आणि भाजापाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे तक्रार केली आहे.
रोहित पवारांची पडळकरांविरोधात मोदी-नड्डांकडे तक्रार
'विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक 'महान नेते' पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. आपण लक्ष घाला', अशी विनंती करणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मोदी-नड्डांना टॅग करुन पडळकरांविरोधात तक्रार केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
'विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक 'महान नेते' पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत.'
'आपल्याकडे स्त्री ला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या 'थोर' नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही.'
'राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारं नाहीच पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा 'महान' नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे.'
पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा… रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी जहरी टीका करत गोपीचंद पडळकरांनी पवारांची खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.