टाटा मोटर्सला पिंपरी चिंचवड महापालिकेने ठोठावला 200 कोटींचा दंड
पुणे, 8 जुलै: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या टेल्को रोडवरील टाटा मोटर्स उद्योग समूहाच्या प्लांटमध्ये अनेक अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या करापोटी टाटा मोटर्सने महापालिकेला 200 कोटी रुपये देणं अपेक्षित असून या संदर्भात पालिकेने टाटा मोटर्सला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
नुकताच महानगरपालिकेने पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करून घेतला त्यात 19 हजार 648 इमारती, मालमत्ता अनधिकृत असल्याचं पालिकेला लक्षात आलं आहे. अनधिकृत मिळकती, इमारतींच्या मालकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्ससह इतर कर वसूल करण्याचं काम पालिकेने सुरू केलं आहे. या 19 हजार 648 इमारतींतून करापोटी पालिकेला 350 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. ही कराची थकबाकी मिळवण्यासाठी पालिकेच्या कर वसूली विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा मोटर्सला बजावलेल्या नोटीशीसंदर्भात पालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, 'टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या आवारात 2008 ते 2016 या काळात आठ हेक्टर क्षेत्रात सर्व्हिस सेंटर, कँटिन, कार पार्किंग शेड व इतर शेड्स तसंच इमारती उभारल्या आहेत आणि त्यांची नोंदणी महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागकडे केलेली नाही. कंपनीने पालिकेत सादर केलेल्या कागदपत्रांतून पालिकेला या अनधिकृत प्रॉपर्टींची माहिती मिळाली. त्यामुळे पालिकेने टाटा मोटर्स कंपनीला 200 कोटी रुपयांचा थकित कर भरण्याचे आदेश देणारी नोटीस बजावली आहे. टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या आवारात येण्यास परवानगी नाकारली, त्यामुळे कंपनीने आमच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच आम्ही या अनधिकृत प्रॉपर्टी गृहित धरल्या असून त्याच्या थकित करापोटी नोटीस बजावली आहे.'
दरम्यान, टाटा मोटर्सने ई-मेलद्वारे याबद्दल स्पष्टीकरण पाठवलं असून, भोसरी कंपनीच्या आवारातील इमारतींसंदर्भात 200 कोटी रुपयांची कर थकबाकी भरण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोणतीही नोटीस कंपनीला पाठवलेली नाही असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.
भोसरीतील कंपनीच्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून आम्ही पिं.-चि. मनपामध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरत आहोत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्येही महानगरपालिकेनी दिलेल्या बिलानुसार पहिल्या अर्ध्या वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स टाटा मोटर्सने भरला आहे. वेळोवेळी महापालिकेने दिलेल्या बिलांनुसार कंपनीने कर भरला असून कंपनीकडे कोणतीही थकबाकी राहिलेली नाही. तसंच काही इमारती नव्याने उभारण्यात आल्या आहेत. पालिकेच्या पद्धतीनुसार त्यांची पाहणी अधिकारी करू शकतात, असं टाटा मोटर्सकडून ई-मेलद्वारे पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
यावर झगडे म्हणाल्या, 'कंपनीच्या परिसरात जाण्यास पालिकेच्या अधिकाऱ्याला परवानगी नाकरण्यात आल्यामुळे त्याने ती नोटीस भोसरी येथील टाटा प्रकल्पाच्या गेटवरच्या सिक्युरिटी गार्डला दिली असून, कंपनीच्या अधिकाऱ्याने नोटीस घेतल्याचा पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे.'
महापालिका क्षेत्रात कोणतीही इमारत बांधताना त्यात बदल करताना पालिकेची परवानगी घेणं गरजेचं असतं तसंच त्याचा कर भरावा लागतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी कंपनीद्वारे अनधिकृत इमारतींचा सर्व्हे करून घेऊन प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.