लाबराव पाटील थेट महाजनांच्या घरी, एकत्र अल्पोपहार, एकाच गाडीत बसून पूरग्रस्तभागांची पाहणी..
जळगाव: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अचानक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोघेही एकाच वाहनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. राज्य सरकार कोसळण्यावर भाजपकडून दावे केलेले जात असतानाच पाटील यांनी अचानक महाजन यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच पाटील यांनी महाजन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणं हा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी शह असल्याचंही समजलं जात आहे.
जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. या पाहणीसाठी जामनेरमध्ये आले असता पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. यावेळी महाजन यांनीही पाटील यांचं हसतमुखाने स्वागत केलं. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात असताना आज गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
चार हजार हेक्टर शेतीचं नुकसान
दोन तीन दिवसांपूर्वी वादळ आलं होतं. त्यामध्ये जवळपास चार हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तसेच तीनशेहून अधिक घरांवरील छप्पर उडून गेल्याचा अंदाज आहे. बाकीचे पंचनामे सुरू आहे, केळी, कापूस आणि मका या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या नुकसान दौऱ्यात आम्ही सर्व पक्षाचे नेते एकत्र आले असून आम्ही पाहणी करत आहोत. सरकार म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू. काही भागात मदत आली आहे. परंतु, काल परवाच्या वादळाचीही मदत लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं पाटील यांनी सांगितलं.
तेव्हा एकमेकांच्या विरोधात राहू
पालकमंत्री तेही होते आणि मीही होतो. कोणत्याही तालुक्यात जात असताना स्थानिक आमदारांना आणि पक्षांच्या नेत्यांना कळवायचं ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही चाळीसगावात आम्ही दौरा केला होता. इथे कोण कोणत्या पक्षाचा नाही. शेतकऱ्यांचं दु:ख हे सर्वात मोठं आहे. निवडणुका येतील, पक्षाचे विचार येतील तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात राहू, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही एकजूट आहोत, असंही ते म्हणाले.
राजकीय अर्थ काढू नका
आमच्या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आज अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा नाही. पालकमंत्री या नात्याने स्थानिक आमदारांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेणे, हा माझा हेतू होता. ज्या वेळेस राजकीय विषय असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात असू. परंतु, शेतकरी संकटात असताना एकमेकांतील मतभेद आणि राजकारण विसरून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगत गुलाबराव पाटलांनी भेटी संदर्भातील चर्चेचे खंडन केले.
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू
राजकीय विषय नाही. चाळीसगावलाही आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकत्रं होतं. हा प्रश्न काही राजकारण करण्याचा नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, निवडणुका लढवू. पण हे दु:ख खूप मोठं आहे. संपूर्ण शेतकरीच नेस्तनाबूत झाला आहे. अनेक लोकांच्या घरावर पत्रं नाही. राहायला जागा नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे कोणत्याही पक्षावरचं संकट नाही. हे सार्वजनिक संकट आहे. शेतकऱ्यांवरचं संकट आहे. त्यासाठी सर्वांनी मिळूनच काम केलं पाहिजे, असं महाजन म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.


