महाराष्ट्र बंद : लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंददरम्यान बसेसची तोडफोड
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे.
9 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन 'महाराष्ट्र बंद' हाक दिली.
"आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत," अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.
बेस्ट बसेचची तोडफोड
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान मुंबईत बेस्ट च्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
नाशकात बाजार समिती बंद
नाशिकमधील मुख्य 16 बाजार समित्यांनी बंद चे आवाहन करत शेतकऱ्यांना समितीत माल आणू नये असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार सोळाही बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद होते, मात्र मालेगाव मध्ये सकाळी याबद्दल अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्यांनी माल आणल्याने किरकोळ प्रमाणात भाजीपाला व फळ मार्केट सुरू करण्यात आले, ते चालु असणार आहे.
कागल इथे रास्तारोको
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसने कागल इथं महामार्ग रोकोचा आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. कोल्हापूर शहरात शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
"लखीमपूर खिरीत जे घडलं, ती देशाच्या संविधानाची हत्या आहे, कायद्याची पायमल्ली आहे. अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्यासाठीचं षड्यंत्र आहे. केंद्र सरकारची अमानुषता इतकी आहे की, राज्या-राज्यात ते लखीमपूर खिरीसारख्या घटना घडवतील. अशा घटनांविरोधात आम्ही आहोत," हे सांगण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.