ऐन दिवाळीच्या तोंडावर ST बसेस राहणार बंद?
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या चिंतेत वाढ होण्यासारखी बातमी समोर येत आहे. एकतर खासगी बसमध्ये वाढवलेल्या अवाजवी दरात दिवाळीत प्रवास न करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन मंडळाची लाल परी एक मोठा आधार आहे. पण आता दिवाळीत लालपरी बंद राहणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रवाशांची चिंता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने आता लाल परी दिवाळीत बंद राहण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. रखडलेले वेतन, थकीत रक्कम आणि एसटीचं विलीनीकरण या तीन महत्त्वाच्या मागण्यांवरून आता एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.
येत्या 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार असून आता ऐन दिवाळीत बसेस बंद राहणार की, त्यांच्या मागण्यावर काही तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता दिवाळीत जर बसेस बंद राहिल्या तर या पुर्वी दिवाळीच्या काळात ओढावलेली परिस्थिती आणि खासगी बसेसची मनमानी यंदाही पाहायला मिळेल यात शंका नाही.
गेल्या काही दिवसात आर्थिक विवंचनेत सापडलेला एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. संपावर जाऊनही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करून मोर्चा काढण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेनं दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.