Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

 खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश


एखादा खाद्यपदार्थ बनविताना त्यात कोणते अन्नघटक वापरले आहेत, याची संपूर्ण माहिती उत्पादक कंपनीने दिली पाहिजे. त्यामुळे हा पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी, हे लोकांना सहजपणे ओळखता येईल, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. बिपीन संघी व न्या. जसमित सिंह यांनी म्हटले आहे की, एखादा खाद्यपदार्थ कोणत्या अन्नघटकांपासून बनला आहे, इतकीच माहिती न देता, ते घटक कोणत्या प्राण्याचे किंवा रोपाचे आहेत, याचाही तपशील उत्पादक कंपन्यांनी दिला पाहिजे. हा पदार्थ नैसर्गिक पद्धतीने बनविला की प्रयोगशाळेत, याचीही माहिती कंपन्यांनी द्यावी.

खाद्यपदार्थ ज्या घटकांपासून बनविले आहेत, त्यानुसार त्यांच्यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असा स्पष्ट उल्लेख करण्याचा आदेश संबंधित कंपन्यांना द्यावा, अशी याचिका राम गौ रक्षा दलाने उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीप्रसंगी दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खाद्यपदार्थ बनविताना वापरलेले घटक, त्यांचे मूळ याबद्दलची सविस्तर माहिती यापुढे कंपन्यांनी न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.


इन्स्टन्ट नूडल्समध्ये डिसोडियम इनोसिनेट हा वापरण्यात येणारा घटक मांस किंवा माशापासून बनवितात. मात्र ती माहिती ग्राहकांना नीट दिली जात नाही. तरीही काही कंपन्या हे खाद्यपदार्थ शाकाहारी असल्याचे सांगतात. या पद्धतीची लबाडी कोणीही करू नये, म्हणून दक्ष राहणे आवश्यक आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

शाकाहारी लोकांची कुचंबणा

कोणत्या पदार्थांमध्ये मांसाहारी घटक वापरले जातात, याची यादी संबंधित विभागाचे अधिकारी करू शकलेले नाहीत. अशा गोष्टींमुळे नागरिकांच्या विशेषत: शाकाहारी पदार्थच खाणाऱ्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.