अल्पवयीन मोलकरीणीला चपलेने मारहाण, २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक
मुंबई : काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मोलकरीणीला २५ वर्षीय अभिनेत्रीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे.
आरोपी अभिनेत्री वर्सोवा येथील एका फ्लॅटमध्ये एकटी राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या चार महिन्यांपासून आरोपी अभिनेत्रीच्या फ्लॅटवर घरकाम करत होती. पीडित तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपी अभिनेत्रीला होती. तरी देखील तिने पीडितेला कामावर ठेवले. याचदरम्यान काम नीट करत नसल्याचे म्हणत आरोपीने पीडितेला अनेकदा मारहाण केली. मात्र यापूर्वी तिने पोलिसांत मारहाणीची तक्रार केली नव्हती. मात्र हा प्रकार पीडितेच्या बहिणीला समजल्याने तिने मंगळवारी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काम करण्यास थोडा उशीर झाल्याने आरोपीने तिच्यावर अत्याचार करत मारहाण केली. यानंतर तिला स्वत:चे कपडे काढण्यास भाग पाडले आणि नंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले. तसेच आरोपीने पीडितेला चप्पलने मारहाण केली. यामुळे पीडितेला डोक्यावर जखमा झाल्या. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पीडितेच्या बहिणाला हा सर्व प्रकार समजला आणि तिने जाऊन तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 आघात, 354 (बी) महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर आणि भारतीय दंड संहितेच्या 504 हेतूपूर्वक अपमान अन्वये एफआयआर नोंदवला आहे. तसेच मुलांचे लैंगिक अपराध कायद्याअंतर्गत (POCSO) देखील गुन्हा नोंदवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.