सत्ताप्रकार ई मध्ये अडकलेल्या मिळकती मुक्त करू लवकरच महसूल मंत्र्यांची भेट घेणार पृथ्वीराज पाटील यांची व्यापारी, नागरिकांच्या बैठकीत ग्वाही
सांगली, दि. ८ : सांगली शहरातील ३५ हजार नागरिकांच्या साडेसातशेहून अधिक मिळकती शासनाच्या सत्ता प्रकार ई या आदेशामध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मिळकती मुक्त करण्यासाठी लवकरच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची तिथल्या व्यापारी व नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार आहोत, आणि हे काम शंभर टक्के मार्गी लावणार आहोत, अशी ग्वाही सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यानी आज येथे दिली.
या आदेशात अडकलेल्या मिळकतधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. महावीर जैन बोर्डिंगमध्ये ही बैठक झाली. वखारभाग, टिंबर एरिया, ओव्हरसियर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नर, रतनसीनगर, गावभाग येथील ३५ हजाराहून अधिक नागरिकांच्या मिळकती सरकारच्या सत्ताप्रकार ई मध्ये अडकल्या आहेत. त्या मुक्त कराव्यात यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित खोकले यांनी स्वागत केले. ॲड. दिलीप नलवडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी माजी उपमहापौर प्रशांत पाटील - मजलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, नगरभूमापन विभागाच्या निर्णयामुळे सत्ताप्रकार ई मध्ये या मिळकती अडकल्या आहेत, त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना आपल्या मिळकती हस्तांतरित करता येत नाहीत. त्यांची खरेदी - विक्री, वाटणीपत्र, बक्षीस पत्र, बँक गहाणखत यापैकी काहीही करता येत नाही. त्यामुळे या मिळकती मुक्त व्हाव्यात आणि त्यासाठीची कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठीचा प्रस्ताव महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेलेला आहे.
ते म्हणाले, गेली पाच वर्षें या मिळकतदारांना मोठा फटका बसलेला आहे. अजुनही त्यांच्या मिळकतीवर टांगती तलवार आहे. या मिळकतधारकांमध्ये छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक यांचा समावेश आहे. त्यांना यातन मुक्त करण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत व्यापारी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासह महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहोत, आणि याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार आहे.
गेल्या दोन वर्षांत तर व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. महापूर आणि कोरोना या दोन संकटामुळे आर्थिक परिस्थिती फारच कोलमडली आहे. त्याकरिता हा निर्णय लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
बैठकीला सनत कत्ते, रवींद्र खराडे, किशोर नावंदर, डॉ. सी. डी. देसाई, संजय आरवाडे, नितीन आरवाडे, दिनेश जाजल, रोहित सारडा, गोकुळ लड्डा, विनय शिरगुप्पे, दिनेश शहा, बाहुबली कबाडगे यांच्यासह अनेक व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.