Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी


सांगली, दि. 10,  : कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने राज्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार राज्यातील तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यात राज्य शासनाकडील निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली‍ डॉ. अभिजीत चौधरी यांनी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश दि. 10 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वाजल्यापासून ते पुढील आदेशांपर्यंत लागू केले आहेत.

1. व्यक्तींची हालचाल - पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. अत्यावश्यक कारणाशिवाय रात्री 11.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल.

2. शासकीय कार्यालये - कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय कोणतेही अभ्यागत कार्यालयात प्रवेश करणार नाहीत. कार्यालय प्रमुखांद्वारे नागरिकांसाठी VC द्वारे ऑनलाइन संवाद उपलब्ध करून देणेत यावा. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करावा. कार्यालय प्रमुखांनी कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे काटेकोर पालन केले जात असलेची खात्री करावी. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत.

3. खाजगी कार्यालये - कार्यालय व्यवस्थापनाने घरूनच काम करणेस प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात एकूण कर्मचारी संख्येच्या 50% पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावा. फक्त लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत.

4. लग्न समारंभ - लग्नसमारंभास जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहणेस परवानगी असेल.

5. अंत्यविधी - अंत्यविधीस जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थित राहणेस परवानगी असेल.

6. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम - सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमास जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहणेस परवानगी असेल.

7. शाळा आणि महाविद्यालये कोचिंग क्लासेस - खालील बाबी वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस दि. 15.02.2022 पर्यंत बंद राहतील.

1. विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम 

2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज.

3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग किंवा इतर तत्सम प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.

8. जलतरण तलाव, स्पा, वेलनेस सेंटर्स - जलतरण तलाव, स्पा आणि वेलनेस सेंटर्स बंद राहतील.

9. हेअर कटिंग सलून, ब्युटी सलून -  हेअर कटिंग सलून 50 % क्षमतेने सुरु राहतील. रोज रात्री 10.00 ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटिंग सलून्सनी कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असेल. सदरची सेवा देणारा व घेणारा दोघेही मास्कचा वापर करतील. फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सदरची सेवा पुविणेत येईल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक असेल.

10. खेळांच्या स्पर्धा - पूर्वीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरु राहतील.

1. प्रेक्षकांना बंदी.

2. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यासाठी बायो-बबल

3. सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.

4. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर / आरएटी करावी

शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना कार्यक्रमांच्या आयोजनाला प्रतिबंध असेल.

11. करमणूक नगरी, प्राणिसंग्रहालये, वस्तू- संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे / नागरिकांसाठीचे कार्यक्रम - करमणूक नगरी, प्राणिसंग्रहालये, वस्तूसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे / नागरिकांसाठीचे कार्यक्रम बंद राहतील.

12. शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सेस मध्ये बंधनासह प्रवेश - 50 % क्षमतेने सुरु राहतील, सर्व नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक असेल. सर्व भेट देणाऱ्या व्यक्ती आणि कर्मचारी कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे तंतोतंत पालन करतील, याची खात्री करणेसाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत. RAT (Rapid Antigen Test) चाचणीसाठी बुध / कियोस्क उभारावेत. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. दररोज रात्री 10.00 ते सकाळी 08.00 वाजेपर्यंत बंद राहतील

13. रेस्टॉरंट, उपाहारगुहे - 50 % क्षमतेने सुरु राहतील. सर्व नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक असेल फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

दररोज रात्री 10.00 ते सकाळी 08.00 वाजेपर्यंत बंद राहतील. दररोज होम डिलीव्हरीला परवानगी असेल.

14. नाट्यगृह, सिनेमा, थिएटर्स - 50 % क्षमतेने सुरु राहतील. सर्व नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक असेल. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

दररोज रात्री 10.00 ते सकाळी 08.00 वाजेपर्यंत बंद राहतील.

15. आंतरराष्ट्रीय प्रवास - भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे राहील.

16. देशांतर्गत प्रवास - दोन्ही लसीकरण किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वी पर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक असेल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. प्रवास करणारे वाहन चालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यानाही हे लागू राहील.

17. माल वाहतूक, औद्योगिक कामकाज, इमारतीचे बांधकाम  - फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तीकडूनच सुरु राहील.

18. सार्वजनिक वाहतूक - फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठीच नियमित वेळेत सुरु राहील.

19. UPSC/ MPSC / वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इ. द्वारे आयोजित केलेल्या परीक्षा - राष्ट्रीयपातळीवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परिक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करणेस पुरेसे असेल. राज्य पातळीवर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. प्रत्यक्ष परीक्षेचेनियोजन करताना कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे पालन केले जाईल.

20. व्यायामशाळा - व्यायामशाळा 50 % क्षमतेने सुरु राहतील. कोणतीही क्रिया करीत असताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सदरची सेवा पुविणेत येईल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक असेल.

1. प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे

1. तातडीचे आवश्यक वैद्यकीय उपचार.

2. अत्यावश्यक सेवा (परिशिष्ट क्र. 1 नुसार).

3. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकीटासह.

4. 24 तास सुरु राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध वेळांमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.

2. कोव्हीड-19 योग्य वर्तनाचे नियम परिशिष्ट क्र.2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.

3. दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलीव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असेल. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना बंद करण्यात येतील. या कामात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळेनंतर सदर आस्थापनेने RAT (Rapid Antigen Test) करून घेणे बंधनकारक आहे.

4. सदर आदेशासोबत परिशिष्ट क्र.1 अत्यावश्यक सेवांची यादी व परिशिष्ट क्र.2 मध्ये कोव्हीड- 19 योग्य वर्तनाचे नियमांचा तपशील सोबत जोडला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध परिशिष्ट क्र.2 मध्ये नमूद केले प्रमाणे गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

परिशिष्ट क्र.1

अत्यावश्यक सेवा

अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल

1) रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.

2) व्हेटरीनरी सेवा, अॅनिमल केअर शेल्टर्स आणि पेट फूड शॉप्स

3) वन विभागाने घोषित केले प्रमाणे वनीकरण सबंधित सर्व कामकाज 

4) विमान वाहतूक आणि संबंधित सेवा (एअरलाइन्स, विमानतळ, देखभाल, कार्गो, ग्राउंड सेवा, केटरिंग. इंधन, सुरक्षा इ.)

5) किराणामाल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, कच्चे/ प्रक्रिया केलेले/ शिजवलेले अन्न विकणारी सर्व प्रकारची दुकाने.

6) शीतगृहे व गोदाम सेवा

7) सार्वजनिक वाहतूक: विमाने, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.  

8) विविध देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या कामकाजाशी संबंधित सेवा

9) स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम 

10) स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा.  

11) भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यांनी अत्यावश्यक म्हणून नियुक्त केलेल्या सेवा

12) “ भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ ”(SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटरीज (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट

13) टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा

14) वस्तूंची वाहतूक

15) पाणीपुरवठा सेवा

16) शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणाऱ्या बियाणे, खते, पशुखाद्य दुकाने, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या आस्थापना

17) सर्व वस्तूंची आयात व निर्यात

18) ई - व्यापार ( फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी )

19) प्रसार माध्यमे (Media)

20) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने; ऑफशोर / ऑनशोअर उत्पादनासह 

21) सर्व प्रकारची मालवाहू सेवा 

22) डेटा केंद्रे (Data Centers) / क्लाउड सेवा वितरक (Cloud Service Provider) / पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा (IT Service)

23) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

24) विद्युत व गॅस पुरवठा सेवा

25) ATM’s

26) टपाल सेवा

27) बंदरे आणि सबंधित सेवा

28) लस/ औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टमहाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators) 

29) कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे

30) व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी येऊ घातलेल्या पावसाळ्यासाठी साहित्याच्या उत्पादनात गुंतलेली केंद्रे

31) केंद्रीय, राज्य आणि स्थानिक सरकारची कार्यालये,  त्यांच्या वैधानिक प्राधिकरणे आणि संस्थांसह

32) सहकारी, PSU आणि खाजगी बँका

33) अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये

34) विमा/मलेडिक्लेम कंपन्या

35) उत्पादन/वितरण व्यवस्थापनासाठी आवश्यक फार्माक्युटिकल कंपनी कार्यालये 

36) भारतीय रिझर्व्ह बँकनियंत्रित संस्था आणि मध्यस्थ ज्यामध्ये स्टँडअलोन प्रायमरी डीलर्स, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनेनियमन केलेल्या मार्केट्समध्ये कार्यरत वित्तीय मार्केट सहभागी यांचा समावेश आहे. 

37) सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन 

38) सर्व सूक्ष्म वित्त संस्था 

39) जर न्यायालये, न्यायधिकरण किंवा आयोगाच्या चौकशीचे कामकाज सुरु असेल तर वकील यांची कार्यालये 

40) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा.

परिशिष्ट क्र. 2

कोव्हीड योग्य वर्तन (CAB) 

कोव्हीड अनुरुप वर्तन (CAB) ची व्याख्या ही कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याद्वारे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना आवश्यक असलेले दैनंदिन सामान्य वर्तन म्हणून केले जाऊ शकते. कोव्हीड अनुरुप वर्तनामध्ये खाली नमूद केलेल्या गोष्टींचा समावेश आहे आणि कोव्हीड 19 विषाणूच्या प्रसारात अडथळा आणू शकणाऱ्या अशा सर्व तर्कसंगत बाबींचा समावेश आहे, ज्याचा प्रसार करण्याची पद्धत येथे दर्शविली आहे.  

मूलभूत कोव्हीड योग्य वर्तनाचे काही नियम खालीलप्रमाणे आहेत जे प्रत्येकाने नेहमी पाळले पाहिजेत. 

1. नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा.  मास्कने नेहमी नाक आणि तोंड झाकले पाहिजे. (रुमाल मास्क म्हणून गणला जाणार नाही आणि वापरणारी व्यक्ती दंडास जबाबदार असेल.) 

2. जिथे शक्य असेल तिथे नेहमीच सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा.

3. हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार आणि चांगले धुवा

4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता नाक /डोळे/तोंडाला स्पर्श करणे टाळा.

5. श्वसनसंबंधी आरोग्याचे नियम पाळावेत.

6. वारंवार स्वच्छ केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा.

7. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू वापरून तोंड आणि नाक झाकून घ्या आणि वापरलेले टिश्यू कचऱ्यात टाका;  एखाद्या व्यक्ती जवळटिश्यू नसेल, तर त्याने हाताने नव्हे तर वाकलेल्या कोपरात खोकलेअगर शिंकले पाहिजे.

8. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

9. आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणे टाळा.

10. गर्दी टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) ठेवा.

11. शुभेच्छा देतानाही सामाजिक अंतर ठेवावे.

12. कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेली इतर कोणतीही तर्कशुद्ध वर्तणूक

अ. कामाचे ठिकाण CAB 

1. वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशात निर्धारित केले संख्येएवढीच कामाच्या ठिकाणी कोणत्याही शिफ्टमध्ये उपस्थित कामगार/कर्मचारी यांची संख्या असेल.

2. या कलमामध्ये नमूद केल्याप्रमाणे कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन प्रत्येकाकडून केले जाईल आणि वर नमूद केलेल्या संस्थेच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांच्या आकलन क्षमतेचा पूर्वग्रह न ठेवता, मालक/संस्था कामाच्या ठिकाणी गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कोव्हीड अनुरुप वर्तनासाठी जबाबदार असेल.  कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर, शिफ्टमधील पुरेशा अंतरांद्वारे, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या ब्रेकमधील अंतर इत्यादींद्वारे सुनिश्चित करावे. जर तेथे खाद्यपदार्थांची व्यवस्था किंवा स्थान असेल तर त्या भोजनालयांसाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन आवश्यक आहे. 

3. थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश आणि सॅनिटायझरसाठी शक्यतो टच फ्री मेकॅनिझमची तरतूद सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांवर आणि सामान्य भागात केली जाईल. याव्यतिरिक्त, कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँडवॉश आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे.  

4. संपूर्ण कार्यस्थळ, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणारे सर्व ठिकाणे वारंवार स्वच्छ करावीत. उदा.  दरवाज्याची हँडल इ., शिफ्ट दरम्यान, याची खात्री करावी.  

5. आरोग्य सेतू अॅपचा वापर खाजगी आणि सार्वजनिक अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे..  

6. कोव्हीड-19  रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकृत असलेल्या जवळपासच्या भागातील  ओळखले जाणारे रुग्णालये / दवाखाने यांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करुन दयावी.  कोव्हीड-19 ची कोणतीही लक्षणे दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा सुविधांमध्ये तात्काळ तपासणीसाठी पाठवावे.  लक्षणे दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वैद्यकीय सुविधांमध्ये हलवले जाईपर्यंत वेगळे ठेवण्यासाठी क्वारंटाइन क्षेत्र निश्चित करावे.

ब. मेळावे

विवाह

1. जास्तीत जास्त पाहुण्यांची संख्या तसेच एकत्र येण्याचे तास यांचे वेळेप्रमाणे नियोजन करावे. 

2. सर्व उपस्थित तसेच सेवा प्रदात्यांनी संपूर्ण समारंभात अनिवार्यपणे मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे आणि कोव्हीड अनुरुप वर्तनामध्ये नमूद केलेल्या बाबींचे पालन करावे

3. अन्नपदार्थाचे वाटप अशा प्रकारे केले पाहिजे की ज्यामुळे जास्त व्यक्तींचा संपर्क होणार नाही आणि भोजनालय / रेस्टॉरंट यांनी सामान्यत: मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. या मार्गदर्शक तत्त्वांच्याशिवाय अन्न पदार्थांचे क्षेत्रामध्ये कोणत्याही वेळी क्षमतेच्या 50% इतकेच अतिथींना सेवा द्यावी. 

4. विवाह हॉलची मालकी असलेल्या संस्था यांनी जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांच्या सामान्यतेचा पूर्वग्रह न ठेवता, पाहुण्यांसाठी पुरेसे हँड सॅनिटायझर / थर्मल स्कॅनर्स उपलब्ध करून द्यावे.  सफाई कर्मचारी आणि खानपान कर्मचाऱ्यांसह सुविधेच्या बाजूच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक असेल. 

5. जर कर्मचारी सदस्य वैध चाचणी न करता आढळल्यास, प्रत्येक चूक करणाऱ्यावर तसेच त्यांच्या आस्थापनेकडून दंड आकारला जाईल. या नियमांनुसार कोणत्याही पाहुण्यांनी उल्लंघन केल्यास, वर आणि वधूचे कुटुंब आणि आस्थापनांना या नियमांनुसार दंड आकारला जाईल.  वारंवार अशी चूक केल्यावर कोव्हीड-19ची केंद्रसरकारची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी आस्थापना बंद करण्यात येईल.

अंत्ययात्रा आणि अंतिम संस्कार

1. सर्व उपस्थित लोकांनी तसेच सेवा  पुरविणा-या प्रदाते यांनी अनिवार्यपणे मास्क घालावे आणि संपूर्ण विधी दरम्यान सामाजिक अंतर राखावे आणि कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन करावे.  

2. स्थानिक प्राधिकरण/संस्था/व्यवस्थापन ज्यांच्याकडे आस्थापनेची जबाबदारी असेल हे सर्वांद्वारे कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार राहतील.  

3. परवानगी असलेली कमाल संख्याही वेळोवेळी निश्चित केलेल्या नियमांनुसार असेल. 

इतर सामाजिक, धार्मिक, निवडणूक, करमणूक किंवा सांस्कृतिक मेळावे: 

1. या मेळाव्यासाठी आवश्यक परवानगी तसेच जास्तीत जास्त उपस्थित संख्येची परवानगी ही वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमांनुसार असेल. 

2. या ठिकाणी खाद्यपदार्थ दिले जात असल्यास, त्याचा विभाग स्वतंत्रपणे दर्शविला जाईल आणि सदर ठिकाणी सामान्यत:  उपहारगृहांसाठी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. जर सदर क्षेत्रात निर्बंध लागू असतील तर अशा ठिकाणच्या कोणत्याही उपहारगृहात जेवायला परवानगी दिली जाणार नाही अथवा अशा मेळाव्यात जेवणही दिले जाणार नाही. 

3. सर्व उपस्थित तसेच सेवा प्रदाते यांनी अनिवार्यपणे मास्क घालावे आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर राखावे आणि कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन करावे . 

4. सदर क्षेत्राचा मालक हा सदर आयोजनामध्ये होणा-या कोव्हीड अनुरुप वर्तनासाठी जबाबदार राहील.  

5. निवडणूकीशी संबंधित मेळावे किंवा उपक्रम आयोजित करताना, निवडणूक अधिकारी हे सदर मेळाव्यात/उपक्रमासाठीची उपस्थित व्यक्तींची कमीत कमी संख्या सुनिश्चित करतील.

क. सार्वजनिक आणि खाजगी वाहतुक: 

1. टॅक्सी/ऑटो आणि इतर खाजगी वाहतूक ऑपरेटर्ससाठी ( बस / रेल्वे वगळता ): 

i. सर्व टॅक्सी / ऑटो आणि इतर खाजगी वाहतूक ऑपरेटर (बस वगळता) स्वत:ची आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करतील. 

ii. कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय प्रवास करताना आढळल्यास / योग्यरित्या मास्क न घातल्यास ते उल्लंघन समजण्यात येईल. उल्लंघन करणारी व्यक्ती तसेच टॅक्सी चालकाला या नियमांनुसार दंड आकारला जाईल. 

2. बसेस: 

I. बसेसच्या बाबतीत, ते वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार परवानगी दिलेल्या क्षमतेने प्रवास करू शकतात.  

II. मास्क नसलेले / मास्क घातलेले नसलेले किंवा कोव्हीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना बसमधून खाली उतरवावे. 

III. सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणांना या नियमांनुसार दंड आकारण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिकारी यांनी प्रवासादरम्यान व्यक्ती/प्रवाशांकडून कोव्हीड अनुरुप वर्तनाचे कठोर पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी.

3. रेल्वे : 

I. सर्व प्रवाशांनी उपरोक्त नमूद केलेल्या कोव्हीड अनुरुप वर्तनाचे अनिवार्यपणे पालन करावे. प्रवास करणेसाठी स्वतंत्र युनिव्हर्सल ट्रॅव्हल पाससोबत बाळगणे आवश्यक आहे.  

II. मास्क नसलेले / मास्क घातलेले नसलेले किंवा कोव्हीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमधून उतरवावे. 

III. सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणांना या नियमांनुसार दंड आकारण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिकारी यांनी प्रवासादरम्यान व्यक्ती/प्रवाशांकडून कोव्हीड अनुरुप वर्तनाचे कठोर पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी.

 IV. आउट-स्टेशन गाड्यांच्या बाबतीत, सर्व प्रवाशांनी अनिवार्यपणे मास्क घालणे आवश्यक आहे आणि सामान्य डब्यात उभे राहण्यास परवानगी दिली जाणार नाही.  त्याचे पालन न केल्याबद्दल उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींनारुपये 500/- इतका दंड आकारला जाईल.  

4. खाजगी कार: 

अनेक व्यक्तींनी खाजगी कारमधून प्रवास करताना, योग्यरीत्या मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. सदर बाबीचे उल्लंघन केल्यास पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडून दंड आकारलाजाईल. 

ड. दुकाने/मॉल/थिएटर्स आणि इतर अशा स्वतंत्र किंवा मल्टी-आउटलेट आस्थापना: 

1. सदर आस्थापना फक्त निश्चित केलेल्या वेळेत आणि वेळोवेळी विविध आदेशांद्वारे परवानगी असलेल्या दिवसांमध्ये खुली राहतील.  

2. संबंधित आस्थापना त्यांच्या सर्व अभ्यागत तसेच कर्मचारी सदस्यांद्वारे कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन होईल याबाबत दक्षता घेतील. जर कोणताही कर्मचारी मास्क घातलेला नसलेचा आढळल्यास किंवा विहित केलेल्या कोव्हीड अनुरुप वर्तनाचे किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापनाद्वारे जारी केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केलेले आढळल्यास, या नियमांनुसार दुकान मालकासह कर्मचारी सदस्यास दंड आकारला जाईल. जर कोणत्याही ग्राहकाने कोव्हीड अनुरुप वर्तनाचेउल्लंघन केले, तर त्याला आस्थापनेद्वारे सेवा दिली जाणार नाही आणि सेवा देत असल्याचे आढळल्यास, उल्लंघन करणाऱ्या ग्राहकासह, आस्थापना मालकालाही दंड आकारला जाईल. वारंवार उल्लंघन केल्यास कोव्हीड-19ची अधिसूचना  अंमलात असेपर्यंत,  संबंधित आस्थापनाचा परवाना किंवा परवानगी काढून घेतली जाईल. 

ई. शास्ती :  

1. या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, र.रुपये 500/- इतका दंड आकारण्यात येईल. 

2. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करवून घेणे अपेक्षित आहे. अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही ठिकाणी (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा र.रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोव्हीड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, आपत्ती म्हणून कोव्हीड-19ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

3. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने कोव्हीड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, र.रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, आपत्ती म्हणून कोव्हीड-19ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल . 

4. जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणा-या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोव्हीड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोव्हीड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, आपत्ती म्हणून कोव्हीड-19ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल. 

5. वारंवार व गंभीर उल्लंघनाच्या बाबतीत भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व्यतिरिक्त भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 269/ 270 नुसार ही संबंधित व्यक्ती / आस्थापना मालक यांना अटक आणि तुरुंगवास केला जाऊ शकतो.   

6. कोव्हीड अनुरूप वर्तणुकीसंबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणाऱ्यावर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोव्हीड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरीलप्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोव्हीड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे,जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढणेत आलेल्या व अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.